(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील ते-ये गावात आयोजित करण्यात आलेली भव्य कबड्डी लीग स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनात यशस्वीरीत्या पार पडली. २१ आणि २२ मार्च रोजी रंगलेल्या या स्पर्धेत माभळे येथील ‘प्रियल स्पोर्ट्स’ संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांकावर मोहर उमटवली.



मैदानावर खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीचे आणि कौशल्याचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अर्थव गेल्ये याला ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रज्वल कळबंटे यांनी आपल्या चपळाईने ‘बोनस किंग’ हा किताब पटकावला, तर उत्कृष्ट चढाईसाठी सागर काष्टे आणि उत्कृष्ट पकडीसाठी आकाश जोशी यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या राकेश रायनाक यांना ‘पब्लिक हिरो’ म्हणून स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, प्रत्येक सामन्यातील पहिला बोनस घेणाऱ्या खेळाडूस श्री. अनंत कापले यांच्या वतीने १०० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि देणगीदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. मैदान व्यवस्था, आकर्षक रंगरंगोटी, देखणा स्टेज आणि चोख पंचगिरी यामुळे स्पर्धेची रंगत वाढली. सूत्रसंचालन आणि डीजे साऊंड सिस्टिमने मैदानावरील वातावरण अधिकच उत्साहवर्धक केले होते. स्पर्धेच्या सांगता समारंभात वाघजाई क्रीडा मंडळ, ते-ये यांच्या वतीने सर्व टीम मालक, खेळाडू आणि क्रीडारसिक प्रेक्षकांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी अशाच प्रकारचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

