(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे काताळे येथील बौद्धवाडी परिसरातील बौद्ध स्मशानभूमीत विहीर बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे पूर्वजांच्या समाध्या (थडगी) बाधित झाल्याचा गंभीर आरोप अण्णा जाधव यांनी करत श्री. अशोक पवार यांनी बेमुदत उपोषण सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी गुहागर तहसील कार्यालयासमोर, गुहागर पोलीस ठाण्याशेजारी सुरू केले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून प्रशासनाला याबाबतचे सूचना पत्र देण्यात आल्याची माहिती मजुर रिपब्लिकन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी रत्नागिरी येथे ( २९ जून ) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मजूर रिपब्लिकन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांच्यासह धर्मांनंद यादव, प्रकाश धोंडीराम पवार, मिलिंद पवार, रवींद्र पवार आदी उपस्थित होते. बौद्ध स्मशानभूमीच्या परिसरात विहिरीसाठी खोदकाम सुरू असून त्यामुळे समाजाच्या पूर्वजांच्या समाध्यांचे नुकसान झाल्याचा अथवा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्मशानभूमीच्या जवळच शासनमान्य विहीर अस्तित्वात असताना नवीन विहिरीचे काम सुरू करण्यामागे जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत संबंधित प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित काम तात्पुरते स्थगित करावे, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, स्मशानभूमीचे संरक्षण करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच समाज प्रतिनिधींना सुनावणीची संधी द्यावी, अशा प्रमुख मागण्या मजूर रिपब्लिकन संघटनेच्या माध्यमातून अण्णा जाधव यांनी केल्या आहेत.
दरम्यान श्री. अशोक पवार यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर सोमवारी ( दि. २९ जून २०२६) गुहागर तहसील कार्यालयासमोर, गुहागर पोलीस ठाण्याशेजारी उपोषण सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर माजी जिल्हाध्यक्ष तसेच मजूर रिपब्लिकन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या विषयासंदर्भात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत स्मशानभूमीचे पावित्र्य आणि समाजाच्या धार्मिक भावनांचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार….
“आम्ही हे उपोषण कोणत्याही वैयक्तिक हेतूने नव्हे, तर न्यायाच्या मागणीसाठी सुरू केले आहे. संबंधित ठिकाणी अनेक बाबी नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहील. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने न्याय द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे,” अशी भूमिका मिलिंद पवार यांनी मांडली आहे.

