(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत रविवारी राजकीय हालचालींना वेग आला असून एका दिवसात तब्बल २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पक्षाने अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात अनपेक्षित खळबळ उडवली आहे. महायुतीकडून अद्याप नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर न झाल्याने शहरातील चर्चांना अधिक जोर आला आहे. आज (१७ नोव्हेंबर) हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गजबजलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून केवळ नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल होत असताना रविवारी ‘आप’ने अचानक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी भरत निवडणुकीचा पटच पलटवला. पक्षाकडून सुस्मिता सुहास शिंदे यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला असून, नगरसेवकपदासाठीही सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात खलिल नुरुद्दीन वस्ता (प्रभाग १६ ब), रेहाना खलील वस्ता (प्रभाग १६ अ), रमीज इसाक झारी (प्रभाग १ ब), तमन्ना करीम खान (प्रभाग ९ ब), रुक्साना लियाकत नावडे (प्रभाग १ अ), नफिसा मोहम्मद मजगावकर (प्रभाग ४ अ) यांचा समावेश आहे. एकाच दिवशी ७ अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. त्यात अस्मिता सुशील चवंडे (१५ अ), मैथिली देवेंद्र मयेकर (१२ अ), अनिकेत अनिल वालम (१ ब), सायमा नदाफ काझी (४ अ), मंजुळा विजय कदम (५ ब), सरिता जितेंद्र कदम (५ ब), कामना अरुण बेग (९ ब) यांचा समावेश आहे.
शिवसेना (शिंदे) गटाकडून ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जागृती राहुल पिलणकर (१२ अ), सायली विकास पाटील (९ ब), संतोष विजय कीर (१४ ब), नाहिदा तन्वीर सोलकर (८ अ). भाजपकडून नितीन लक्ष्मण जाधव (१ ब) यांनी उमेदवारी दाखल केली. तर शिवसेना (उभाठा) गटाने ५ उमेदवारी अर्ज दाखल करत आपली उपस्थिती दाखवली. त्यात पसाद सुरेश सावंत (३ ब), राजश्री बिपीन शिवलकर (१५ अ), साजीदखान अकबरखान पावसकर (८ ब), अमित वसंत विलणकर (१५ ब), नाझनीन युसुफ हकिम (९ ब) यांचा समावेश आहे. एका दिवसात विविध पक्ष आणि अपक्षांकडून झालेल्या अर्जांच्या मुसळधार ओघामुळे रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. आता अंतिम क्षणी कोणत्या नवीन हालचाली समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

