(रत्नागिरी / वार्ताहर )
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा ७० वा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात ॲड. मनीष नलावडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. पुणे येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या माजी जिल्हा गव्हर्नर मंजू फडके यांच्या हस्ते त्यांना रोटरीची मानाची कॉलर प्रदान करण्यात आली. यावेळी आनंद चौगुले यांची सचिवपदी, तर धीरज वेल्हाळ यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.
पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या तथा पदग्रहण अधिकारी मंजू फडके यांनी रोटरीची विचारधारा, नेतृत्व, संघभावना आणि समाजसेवेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. “तुम्हीच तुमचे आणि तुमच्या संस्थेचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर आहात,” असे सांगत त्यांनी प्रत्येक सदस्याने आपल्या वर्तनातून आणि कृतीतून संस्थेची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आवाहन केले.
त्या म्हणाल्या, “रोटरीमध्ये अशा व्यक्ती एकत्र येतात, ज्यांना समाजासाठी विधायक कार्य करण्याची तळमळ असते. एकट्याने काम करण्यापेक्षा संघभावनेने एकत्रितपणे काम केल्यास समाजात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतो.” रोटरी सदस्यत्वाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, “आयुष्यात मौजमजा सर्वजण करतात; मात्र रोटरी सदस्य मौजमजेबरोबर सामाजिक भान जपत समाजासाठीही कार्य करतो.”
नेतृत्वविकासावर भाष्य करताना त्यांनी समस्या हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. समस्यांचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढण्याची वृत्तीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉफी मशीनचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, माणसे तीच असतात; मात्र त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेण्याची क्षमता हेच नेतृत्वाचे खरे कौशल्य आहे. प्रभावी संवाद, प्रेरणा आणि संघभावना यांमुळे कोणतीही संस्था यशस्वी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
नूतन अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी अध्यक्षपद स्वीकारताना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सात दशकांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. “या प्रतिष्ठित क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेल्या ७० वर्षांत क्लबने समाजसेवेची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे. ती अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे त्यांनी सांगितले.
रोटरी इंटरनॅशनलच्या ‘Create Lasting Impact’ आणि डिस्ट्रिक्टच्या ‘Team Phoenix’ या संकल्पनांशी सुसंगत राहून रोटरी वर्ष २०२६-२७ हे ‘कर्तव्याचा जागर महोत्सव’ म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. “हे केवळ एक रोटरी वर्ष नसेल, तर सेवा, संस्कार, विकास आणि उत्साहाचा अखंड उत्सव असेल. प्रत्येक सदस्य, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाला या उपक्रमांचा भाग बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रोटरीच्या सात प्रमुख सेवा क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापना, रोगप्रतिबंधक उपाय, स्वच्छ पाणी व स्वच्छता, माता-बाल आरोग्य, शिक्षण व साक्षरता, आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
क्लबच्या ७० व्या वर्षानिमित्त ‘७० विद्यार्थी दत्तक योजना’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आवश्यक गरजांसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी ‘Clean City – Green City’ अभियानांतर्गत सुमारे पाच एकर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनचे सहकार्य लाभणार आहे.
किनारी भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांच्या सहकार्याने खेकडा संवर्धन, शिंपले संवर्धन, मुसल संवर्धन, मासे मूल्यवर्धन, शोभिवंत मासे पालन तसेच समुद्री शेवाळ संवर्धन यांसारख्या प्रकल्पांना रोटरीकडून मदत केली जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला बचतगट आणि मच्छीमार बांधवांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी श्री पद्धतीच्या शेतीचे मॉडेल उभारण्यात येणार असून पर्यावरणपूरक शेतीचा संदेश दिला जाणार आहे. तसेच ‘Mission Youth Against Drugs’ या अभियानांतर्गत युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
‘Family Health Mission’ अंतर्गत विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना आरोग्य तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आगामी ३० ऑगस्ट रोजी ‘रेन रन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यातून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे.
रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठीही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच क्लब सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दरमहा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब अधिक सक्षम करण्यात येणार असून रोटरीची सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन क्लब स्थापनेचाही संकल्प करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील १८ वर्षांवरील युवक-युवतींनी रोटरॅक्ट क्लबमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. इच्छुक युवक-युवतींच्या मुलाखती घेऊन त्यांना क्लबमध्ये प्रवेश देण्यात येणार असून नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि कौशल्यवृद्धीच्या माध्यमातून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी सर्व सदस्यांना ‘कर्तव्याचा जागर’ या संकल्पनेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करत, रोटरीच्या ‘Service Above Self’ या ब्रीदवाक्याला कृतीत उतरवून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे ७० वे वर्ष समाजसेवा, विकास आणि प्रेरणादायी उपक्रमांनी अविस्मरणीय बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पदग्रहण सोहळ्यास रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरीचे विद्यमान व माजी पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० व्या वर्षाच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली. आधुनिक विचार, युवकांचा सहभाग आणि व्यापक समाजहिताच्या उपक्रमांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी नव्या पर्वाची सुरुवात करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

