(संगमेश्वर /एजाज पटेल)
बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या देवरुख आगार व्यवस्थापनाने सध्या प्रवाशांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा जणू शिमगा मांडला आहे. संगमेश्वर येथून कोंडये येथे सकाळी नऊ वाजता जाणारी एसटी बस गेल्या आठ दिवसांपासून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करून प्रशासनाने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे.
सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून कोंडये, डावखोल यांसारख्या ६ ते ७ गावांतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे या बस अभावी प्रचंड हाल होत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीची जाणीव असूनही देवरुख आगाराचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी क्रूर थट्टा चालवल्याचा संतापजनक आरोप आता ग्रामस्थांमधून होत आहे.
एकीकडे शासन शिक्षण हक्क आणि मुलींना मोफत प्रवास अशा योजनांच्या जाहिराती करत असताना, दुसरीकडे देवरुख आगार व्यवस्थापन मात्र प्रत्यक्ष मैदानात विद्यार्थ्यांची वाट अडवून बसले आहे. कोंडये परिसरातील विद्यार्थ्यांना आपली परीक्षा केंद्रे गाठण्यासाठी ही नऊ वाजताची बस एकमेव आधार होती. ही बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना आता पहाटे सहा वाजताच घर सोडावे लागत आहे. जो वेळ विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी उजळणीसाठी द्यायला हवा, तो वेळ बसच्या प्रतीक्षेत आणि पायपीट करण्यात वाया जात आहे.
या संदर्भात देवरुख आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांच्याकडून प्रवाशांना आणि पालकांना अत्यंत उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे समजते. अधिकाऱ्यांच्या या मुजोर वागणुकीमुळेच एसटी सेवेचा हा खेळखंडोबा झाला असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण भाग राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा मतदारसंघ असून, खुद्द पालकमंत्र्यांच्याच क्षेत्रात एसटी प्रशासनाकडून जनतेच्या भावनांशी असा खेळ खेळला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक ही बस सेवा विस्कळीत केली जात असल्याचा गंभीर आरोप संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि भविष्याशी असा खेळ खेळण्याचा अधिकार या अधिकार्यांना कोणी दिला? असा रोकठोक सवाल आता विचारला आहे.
या सर्व प्रकरणावर आता राजकीय वातावरणही तापले असून, कोंडये गावचे सरपंच तथा शिवसेना (शिंदे पक्ष) कसबा विभाग प्रमुख महेश देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि प्रवाशी जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या देवरुख आगाराला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा इशारा देत त्यांनी उद्या बुधवारी संगमेश्वर आगारावर कोणतीही पूर्वकल्पना न देता धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक तसेच इतरही व्यवसायिक व प्रवाशी जनता जे या मार्गांवरील एसटी गाडीवर अवलंबून आहेत, ते आता एसटी नियंत्रण कक्षा समोर ठिय्या मांडणार आहेत. या ईशाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला आणि परिणामांना केवळ आणि केवळ एसटी प्रशासनच जबाबदार असेल, असे देसाई यांनी ठणकावून सांगितले आहे. आता या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तरी देवरुख आगाराला जाग येते की विद्यार्थ्यांचा वनवास असाच सुरू राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

