(संगमेश्वर / एजाज पटेल)
गाडी कितीही महाग असो, तिच्या चाकात हवा कमी असेल, तर ती पंक्चर होणारच; पण ग्राहकांना पंपावर हवा भरण्यासाठी असलेल्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. हवा नाही, प्यायला पाणी नाही, स्वच्छतागृहाला कुलूपच ठोकलय की काय, अशा अनेकांच्या येथील संतप्त प्रतिक्रिया आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील सीएनजी पंपावर येणारे वाहन चालक आणि प्रवाशी वर्गातून वाहनधारकांना दिवसाला लाखो रुपयांचे सीएनजी विकणार्या पंपांवर ग्राहक राजाला नियमानुसार सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. त्या सुविधांचीच येथे वानवा असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना गैरसोईचा फटका सहन करावा लागत आहे. याची त्वरित दखल सबंधित प्रशासन विभागाने घेणे गरजेचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात डिंगणी येथे सर्वात पहिला सीएनजी पंप सुरु करण्यात आला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील शास्त्रीपुल आंबेड मार्गे गणपतीपुळे या ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर असलेला हा पंप आहे. या पंपावर सीएनजी भरण्यासाठी नेहमीच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. परंतु या पंपावर शासनाने ठरवून दिलेल्या ज्या सुविधा वाहनधारकांना मिळणे अपेक्षित आहे, त्याची येथे वानवा आहे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
येथील पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी पिण्याचे पाणीच नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या कुलरवर अक्षरशः धुरळा बसला असून कुलर पाण्याविना खडखडाट झाला आहे. महिला तसेच पुरुषांसाठी सुसज्ज असे स्वछतागृह आहे, पण ते कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फक्त देखव्यासाठीच स्वछतागृह बांधण्यात आले आहे की काय, अशी चर्चा येथे होते. अनेकांकडून उपस्थित केला जाणारा हा प्रश्न योग्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण तासंनतास सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना ग्राहकांना वेळेला ज्या आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे, ते मिळणे दुरापस्त झाले आहे. बंद स्वछतागृहामुळे महिलांची तर फार मोठी कुचंबणा होत आहे. तसेच या पंपावर रात्रंदिवस काम करणाऱ्या कामगारांसाठी सुद्धाही या समस्या मोठ्या गैरसोईच्या झाल्या आहेत.
गाड्यांच्या चाकात हवा भरण्याचेही येथे कोणतेच साधन उपलब्ध नाही. पंपावर येणाऱ्या वाहनाच्या चाकातील हवा तपासणी तसेच हवा भरणेही मोफत सुविधा पुरवणे गरजेचे असताना पंप सुरु झाल्यापासून येथे या सुविधेची सुद्धा वानवाच आहे. येथील आस्थापना ग्राहकांच्या हक्कावर जामीवपूर्वक गदा आणत असून याची त्वरित दखल सबंधित प्रशासनाने घेऊन योग्य ती कार्यवाईचा बडगा उचलण्याची मागणी वाहनचालक तसेच प्रवाशी वर्गातून केली जात आहे.