(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील प्रसिद्ध वेदा अगरबत्ती दुकान मालक निलेश कदम हे संगमेश्वर शहरापुरतेच नव्हे तर तालुक्यात सामाजिक कार्य करणारा निस्वार्थी व्यक्ती म्हणून प्रतिष्ठित मानले जातात. कदम यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई कुर्ला या ठिकाणी झाले असून माध्यनिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संगमेश्वर तालुक्यात त्यांनी पूर्ण केले. मुंबई येथे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांचे वडील श्रीधर कदम हे करत असलेल्या सामाजिक कार्याची कास त्यांनी शाळा शिक्षण घेत असलेल्या वयातच धरली. सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळते असे त्यांचे वडिलांचे म्हणणे होते. म्हणूनच त्यांनी शालेय जीवनात समाज कार्याची पकडलेली कास आजपर्यंत सोडली नाही.
सामाजिक कार्यात रमलेला हा धेयवेडा युवक समाज हिताचे कार्य करण्यात सदैव अग्रस्थानी असतो. म्हणूनच निलेश कदम हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर अगदी तालुक्यातील खेडोपाड्या पर्यंत प्रख्यात आहेत. त्यांची खरी ओळख ही वेळ व स्वार्थ अपेक्षा न करता वेळप्रसंगी लागेल ती मदत करण्यासाठी मदतीचे दोन हात पुढे करत पुढे सरसावतात.
निलेश कदम यांचा सामान्य ते असामान्य व्यक्तिमत्वापर्यंतचा प्रवास आदर्श घेण्याजोगा आहे. जनकार्य करतांना त्यांनी जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. स्वच्छ प्रतिमा ठेऊन त्यांनी समाजकार्य केलं. समाजकार्य करताना त्याने कधी स्वार्थ साधण्याचा हेतू मनाशी बाळगला नाही. किंवा गैरकामे केली नाहीत. तर अडलेल्या नडलेल्या लोकांच्या हक्कासाठीच ते कायम लढत राहिले आहेत.
निलेश कदम यांच्या समाजकार्यांची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या शिफारस वरून प्रशासनाने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. पद मिळालं म्हणुन त्यांनी समाजकार्यात खंड पडू दिला नाही. आजही लोकांची कामे ते तेवढ्याच प्रखरतेने करत आहेत. मग ती कार्यालयीन कामे असो किंवा प्रशासनाकडून अडलेली कामे असो वा अन्य सामाजिक कार्य असो त्यांना साद घातली की मार्गी लावण्यासाठी त्यांची धडपड ही ठरलेलीच, त्यामुळे लोकं आजही त्यांच्याकडे हक्काने समस्या व प्रश्न घेऊन येतात. जनसामान्यांच्या हक्काचा माणूस ठरलेला आजही समाजकार्याची धुरा तेवढ्याच ताकदीने वाहतो आहे.
अशा सामाजिक कार्य करणाऱ्या निलेश कदम यांचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध क्षेत्राचे लोक, व्यापारी, मित्रमंडळी, शालेय जीवनातील वर्ग मित्र आदींनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी सोशल मीडियावरून तसेच कॉल करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

