(रत्नागिरी / वार्ताहर)
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या स्थानिक पातळीवरच निकाली निघणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांचे अर्ज आणि तक्रारी विहित मुदतीत निकाली काढाव्यात. जुनी प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत असून, ती वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांचा आढावा घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भूमिअभिलेख अधीक्षक सचिन इंगळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आदी उपस्थित होते.
कारवांचीवाडी आदर्श वसाहतीतील अपार्टमेंटच्या प्रकरणाबाबत तातडीने निर्णय
कारवांचीवाडी आदर्श वसाहत येथे बांधण्यात येत असलेल्या अपार्टमेंटबाबत प्राप्त झालेल्या स्थळपाहणी अहवालावर तातडीने कार्यवाही करून निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिले. विकासकाकडून नियमांचे पालन होत नसेल, तर त्याबाबत योग्य आदेश काढावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणंद शिवार रस्ते, सिमांकन तसेच वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण यांसारख्या विषयांवर तहसीलदार, प्रांताधिकारी आणि भूमिअभिलेख विभागाने गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. मागील १५ दिवसांत प्राप्त झालेल्या अर्जांवरही विहित मुदतीत निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
एप्रिलपासूनची प्रकरणे प्रलंबित असल्याने नाराजी
लोकशाही दिनातील मागील प्रलंबित अर्जांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. एप्रिल महिन्यापासूनचे काही अर्ज अद्यापही प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नागरिकांनी विहित पद्धतीने दाखल केलेल्या तक्रारी आणि अर्जांवर वेळेत कार्यवाही होऊन त्यांचा निकाल लागणे आवश्यक आहे. नागरिकांना आपल्या समस्यांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. प्रलंबित प्रकरणे विहित मुदतीत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी दिला.

