(रत्नागिरी)
बांधकाम कामाचे देयक मंजूर करून स्वाक्षरी करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उप अभियंता (वर्ग–१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. संजय तुळशीराम सळमाखे असे अटक करण्यात आलेल्या उप अभियंत्याचे नाव असून आज (मंगळवार, १६ डिसेंबर) रोजी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. संबंधित ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार करण्यात आले होते. या देयकासह कामाच्या फोटोंवर लोकसेवक संजय सळमाखे यांची स्वाक्षरी आवश्यक होती.
तक्रारदार १२ डिसेंबर रोजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी उप अभियंता सळमाखे यांच्या कार्यालयात गेले असता, देयक मंजूर करण्यासाठी तसेच कामांच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी सळमाखे यांनी सात हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. आज (मंगळवार, १६ डिसेंबर) रोजी उप अभियंता संजय सळमाखे यांनी तक्रारदाराकडे लाचेची रक्कम मागून ती स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानंतर गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील त्यांच्या दालनात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

