(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दिलासा ठरलेली प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील मोफत रक्त व अन्य प्रयोगशाळा तपासणी सेवा अखेर बंद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली ही सुविधा शासकीय आदेशानंतर थांबविण्यात आल्याने ग्रामीण रुग्णांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आता खर्चिक तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांकडे धाव घ्यावी लागणार असल्याने गरीब व सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविली जाते. अल्प शुल्कात उपचार व मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही केंद्रे अनेक गावांसाठी जीवनदायिनी ठरली आहेत. विशेषतः रक्त तपासणीसह विविध प्रयोगशाळा चाचण्या मोफत उपलब्ध होत असल्याने ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र, आता या सेवेलाच ब्रेक लागल्याने नागरिकांची गैरसोय वाढणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रयोगशाळा सेवा हा महत्त्वाचा घटक मानला जात होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निविदा प्रक्रियेद्वारे एचएलएल लाइफ केअर लिमिटेड या कंपनीची राज्य शासनाकडून निवड करण्यात आली होती. त्यानुसार २०१७ पासून खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात येत होत्या. मात्र, ही सेवा अचानक बंद झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आता रक्त, लघवी व इतर आवश्यक तपासण्यांसाठी खासगी लॅबचा आधार घ्यावा लागणार आहे.
वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणारा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आरोग्य व्यवस्थेतील ही कपात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नव्या अडचणी निर्माण करणारी ठरत असून, मोफत तपासणी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

