(राजापूर / तुषार पाचलकर)
विठापेठ-मलकापूर-अनुस्कुरा-साटवली-पावस या राज्य महामार्गावरील ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावर वाहतुकीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, या वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुरेशी कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
याच मार्गावरील पाचल ग्रामपंचायत हद्दीतील उचवल्या परिसरात रविवारी, दि. २ ऑगस्ट रोजी दोन ते तीन झाडे मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
घटनेची माहिती मिळताच पाचल ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कळविल्याचे सांगण्यात आले. मात्र, विभागाकडून तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी पथक पाठविण्याऐवजी एका ठेकेदाराला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर बराच वेळ कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थ आणि वाहनचालकच उतरले रस्ता मोकळा करण्यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करण्याऐवजी स्थानिक ग्रामस्थ आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनीच पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली झाडे आणि झाडी हटविण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प राहिल्यानंतर ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर सुमारे तासाभरात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खड्ड्यांची समस्या कायम; आंबा घाट बंद असल्याने वाहतुकीचा अतिरिक्त भार
ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या निर्माण होते. रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीबाबत दरवर्षी आश्वासने आणि कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जाते; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
यंदा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद असल्याने मोठ्या प्रमाणातील वाहतूक या मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच खराब असलेल्या रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडत असून खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर बनल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
‘या मार्गाची जबाबदारी कोण घेणार?’
एकीकडे वाढती वाहतूक, दुसरीकडे रस्त्यावरील खड्डे आणि त्यातच पावसाळ्यात रस्त्यावर झाडे कोसळण्याच्या घटना, यामुळे ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावर झाडे कोसळल्यानंतरही संबंधित विभागाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहोचत नसतील, तर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीला कोण धावणार, असा सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
रस्त्याची नियमित देखभाल, धोकादायक झाडांची पाहणी, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कथित दुर्लक्षाविरोधात या मार्गावरील जनता लवकरच आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
‘या मार्गाची जबाबदारी नेमकी कोण घेणार आणि कोकणकरांचा सुखकर व सुरक्षित प्रवास कधी सुरू होणार?’ हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

