(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अपेक्षा मासये यांनी आपला विजय हा आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या विकासकामांचा आणि जनतेच्या विश्वासाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
अपेक्षा मासये म्हणाल्या की, सुरुवातीला या निवडणुकीत उतरण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मात्र आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून उमेदवारीचा प्रस्ताव आला. अशावेळी विकासाच्या एकाच ध्येयाने सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या शब्दाला नकार देणे मला शक्य झाले नाही. सार्वजनिक जबाबदारी म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाने मला पंचायत समितीची उमेदवारी दिली.
निवडणूक प्रचारादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काहीवेळा एकाकी पडल्यासारखेही वाटले. मात्र मागे हटायचे नाही, हा निर्धार पक्का होता. प्रत्यक्ष प्रचारात प्रत्येक मतदाराशी संवाद साधताना मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. “तुम्ही काळजी करू नका घाबरू नका, विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असे शब्द अनेक ठिकाणी ऐकायला मिळाले. आमदार भैय्या सामंत यांनी केलेली विकासकामे आणि अपूर्वा सामंत यांची मेहनत यामुळे लोकांचा विश्वास आमच्यासोबत असल्याचे जाणवत होते.
या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहकारी, नातेवाईक आणि हितचिंतक सर्वजण एकसंघपणे कामाला लागले. विरोधकांकडून चुकीचा प्रचार झाल्याचेही ऐकायला मिळाले, मात्र त्याला उत्तर देण्यात वेळ न घालवता संयमाने आणि प्रामाणिकपणे काम करण्यावर भर दिला. लोकांना न्याय दिला असेल, तर तो निकालातून दिसेल, हा विश्वास अखेर खरा ठरला.
गावातील तसेच परिसरातील इतर गावांमधील मतदारांनी दिलेल्या निस्वार्थ पाठिंब्याबद्दल अपेक्षा मासये यांनी मनापासून आभार मानले. “ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांच्याबद्दलही मनात कोणताही राग नाही. त्यांच्या मतांमुळेच या विजयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे,” असे त्या म्हणाल्या.
या विजयामागे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विकासाच्या ध्येयाने केलेले आणि अव्याहत सुरू असलेले काम, लोकांच्या मनात निर्माण झालेला त्यांच्यावरील विश्वास तसेच अपूर्वा सामंत यांचा मोठा जनसंपर्क हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. हा विजय म्हणजे या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे अपेक्षा मासये यांनी स्पष्ट केले. पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आणि निष्ठेने विकासकामे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

