(संगमेश्वर / प्रतिनिधी)
काही महिन्यांपूर्वीच रत्नागिरी येथील शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्याला शिक्षिका महिलेसोबत गैरवर्तन केल्यामुळे त्याला निलंबित करून चांगलाच धडा प्रशासनाने शिकवला आहे. ही घटना ताजी असताना आता संगमेश्वर तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या सूचनेप्रमाणे चालणाऱ्या काही सहकाऱ्यांचा प्रताप समोर आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यात पार पडले. या प्रशिक्षणात देण्यात आलेल्या जेवणाबद्दल चौकशी केल्याने कडवई येथील एका शाळेत गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळा तपासणीच्या नावावर महिला शिक्षिकेला त्रास दिल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात आता शिक्षिका महिलेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
शिक्षिका महिलेने आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या ६० असून माझ्या ताब्यात असलेले वर्ग इयत्ता ४ थी व ५ वी असे आहेत. शाळेची वार्षिक तपासणी दिनांक २१/०३/२०२५ रोजी झाली. परंतु तपासणी पूर्व भेट दिनांक १७/०३/२०२५ रोजी झाली होती. त्या भेटीवेळी केंद्र प्रमुख श्री दीपक यादव सर, श्री संतोष कदम (शाळा तुरळ हरेकरवाडी) व श्री दीपक टक्के (शाळा कडवई धामणाकवाडी) असे तीन अधिकारी आले होते. त्या भेटीवेळी माझ्या वर्गाची तपासणी केली असता श्री दीपक टक्के यांनी इयत्ता चौथीच्या वर्गाची तसेच श्री संतोष कदम यांनी इयत्ता पाचवीच्या वर्गाची तपासणी केली होती. त्याचबरोबर केंद्रप्रमुख श्री दीपक यादव सर यांनीदेखील इयत्ता पाचवीच्या वर्गाची तपासणी केली होती. या तपासणीमद्ये अखेर सर्वांनी इयत्ता चौथी व पाचवीच्या वर्गाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले होते. परंतु इयत्ता पहीली ते तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी बोलके नाहीत अशी नाराजी सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.
परंतु वार शुक्रवार दिनांक २१/०३/२०२५ रोजी आमच्या शाळेची वार्षिक तपासणी करण्यात आली. यावेळी मा श्री प्रदीप शामराव पाटील ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती संगमेश्वर), श्री दीपक यादव (केंद्रप्रमुख केंद्र कडवई उर्दू), श्री भास्कर जंगम ( केंद्रप्रमुख केंद्र धामणी), श्री दिलीप जाधव ( केंद्रप्रमुख केद्र संगमेश्वर नं २), श्री. रामराव दडस ( केंद्रप्रमुख केद्र चिखली), श्री गोताड (केंद्रप्रमुख केंद्र कासे), श्री दिगंबर सुर्वे (केंद्रप्रमुख केद्र आरवली), श्री बाबासो यादव (केंद्रप्रमुख केद्र कुचांबे), श्री प्रमोद चिले (केंद्रप्रमुख केंद्र शृंगारपुर ) असे ९ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमच्या शाळेत इतर शिक्षक असतानाही या सर्वांची कोणत्याही बाबतीत तपासणी न करता प्रत्येक गोष्टीवर मला बोलण्यात आले,
असे शिक्षिका महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच, माझ्या जातीबद्दल (बौद्ध) उल्लेख केला गेला. बुरंबी येथील प्रशिक्षणाच्या वेळी भोजनाच्या दर्जाबाबत सर्व कर्मचारी समवेत भोजनाचा दर्जा चांगला नाही असे मी बोलले. त्याचा राग मनात ठेऊन वार्षिक तपासणीच्या वेळी हा मुद्दा हावभाव करून बोलण्यात आला व माझे खच्चीकरण करण्याचे काम श्री भास्कर जंगम, श्री दिलीप जाधव यांनी हेतू पुरस्कर केले. सन २०२४-२५ इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ०९/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र उर्दू हायस्कूल येथे झाली होती. ह्या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री दीपक यादव (केंद्रप्रमुख केद्र कडवई उर्दू) हे होते. तर श्री संतोष कदम (शाळा तुरळ हरेकरवाडी), श्री रामराव दडस (केंद्रप्रमुख केद्र चिखली), तसेच इतर काही शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होते. यावेळी श्री संतोष कदम ( शाळा तुरळ हरेकरवाडी) यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असताना पहिला पेपर पूर्णपणे सोडवून त्याची उत्तरे आपल्या केंद्रातील शाळांच्या विद्यार्थ्यांना सांगितली. तेव्हा सदर बाब त्यांच्या वर्गात परीक्षा देत असलेल्या माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांने पाहिली. व ही बाब त्या विद्यार्थ्याने त्याचे पालकांना सांगितली. ही घटना मीच शिक्षक म्हणून या विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगितली असा गैरसमज करून याच वार्षिक तपासणीच्या वेळी हि घटना तुम्ही पालकांना का सांगितली ? अशी विचारणा मला करण्यात आली. या गोष्टीवरून मला तपासणी अधिकारी रागारागात बोलले. तसेच आम्ही तुम्हाला बडबडलो म्हणून जर तक्रार करणार असाल तर ती तुम्ही तालुका किंवा जिल्हा पातळीवर न करता आयुक्त कार्यालयात आम्हा सर्वांची तक्रार करा. तालुका किंवा जिल्हा पातळीवर तक्रार केल्यास आम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही असे श्री जंगम यांनी टेबलावर जोरजोरात हात आपटत सांगितले. असेही तक्रार अर्जात म्हटले आहे.
वार्षिक तपासणी ही पूर्व रोष मनात ठेऊन घेण्यात आली?
वार्षिक तपासणी करीत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता तपासणी करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे जाणवले. कारण वार्षिक तपासणी हि केवळ आणि केवळ माझी आणि माझ्या ताब्यात असलेल्या वर्गाचीच झाल्याचे मला जाणवले. तपासणीवेळी किमान एका पाठाचे निरीक्षण करणे अपेक्षित आहे, परंतु या तपासणी वेळी एकही शिक्षकाच्या पाठाचे निरीक्षण करण्यात आले नाही. ९ अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी आले असताना देखील इयत्ता १ ली ते ४ थीचे वर्ग श्री रामराव दडस यांनी तर इयत्ता ५ वी ते ७ वीचे वर्ग श्री दिलीप जाधव यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले. इतर सर्व केंद्रप्रमुख यांनी माझ्या वर्गाचे संपूर्ण रेकॉर्ड कार्यालयात मागवून त्याचा अभ्यास करीत बसले होते. त्यातून शोधून शोधून चुका काढण्याचा प्रयत्न उर्वरित अधिकार्याकडून होत होता. याचाच अर्थ सदर वार्षिक तपासणी ही पूर्व रोष मनात ठेऊन घेण्यात आली. असा माझा ठाम विश्वास असल्याचे तक्रारदार शिक्षिकेने म्हटले आहे.
गट शिक्षणाधिकारीच लेट आले, शिक्षिकेला बाहेर उभे ठेवले….
या तपासणी पथकाचे प्रमुख म्हणून गट शिक्षणाधिकारी श्री प्रदीप शामराव पाटील हे होते, परंतु ते स्वतः १०.३० वाजता शाळेमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी माझ्या वर्गाची तपासणी होत असताना मला वर्गाच्या बाहेर थांबावयास पाटील साहेब यांनी सांगितले आहे, असे मला तपासणी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे माझ्या ताब्यातील वर्गाची तपासणी होत असताना मला बाहेर जायला सांगितल्याने वर्गाची तपासणी माझ्यासमोर झाली नाही. तपासणी नंतर ११.३० वाजता शाळेची वेळ संपल्याने इयत्ता १ ली ते ३री व ६ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. परंतु माझ्या ताब्यात असलेले इयत्ता ४ थी व ५ वीच्या विद्यार्थ्यांना मात्र १२.४५ वाजता घरी पाठवण्यात आले. हे सर्व मा श्री पाटील साहेब यांच्या सांगण्यावरून सदर तपासणी अधिकार्यांनी केले आहे. असे त्या सर्वांचे स्पष्ट म्हणणे होते. असेही तक्रारी अर्जात म्हटले आहे.
आम्हाला प्रश्न कसे विचारू शकता?, सज्जड दम भरला, अन् तब्बल दीड तास उभे ठेवले….
तपासणी पूर्ण झाल्यानंतर मला तसेच माझ्या शाळेतील इतर सहकारी शिक्षकांना मुख्याध्यापक कार्यालयात बोलावून त्यांच्यासमोर मला तुमची किती वर्ष सेवा झाली? असा प्रश्न करून तुम्हाला शैक्षणिक कामकाज अजिबातच येत नाही. शैक्षणिक कामकाज तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर शिकणार आहात काय? असे प्रश्न श्री पाटील साहेब यांनी विचारले. तसेच तुम्ही शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण वेळी भोजनाच्या दर्जाबाबत आम्हाला प्रश्न कसे विचारू शकता ? प्रशिक्षण वेळी जे भोजन मिळेल ते गुपचूप खावे अन्यथा आपला स्वतःचा डबा घेऊन प्रशिक्षणाला यावे. इथून पुढे अशाप्रकारची कोणतीही तक्रार खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम भरण्यात आला. त्याचबरोबर शेरा लिहिताना गट शिक्षणाधिकारी श्री प्रदीप पाटील यांनी माझ्या नावाचा उल्लेख करून बाई विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात, असा शेरा शेरेबूक मध्ये लिहिण्यात आला. यावेळी सर्व अधिकारी, मुख्याध्यापक कार्यालयात श्री प्रदीप पाटील यांच्या आजूबाजूला बसलेले होते व मला मुख्याध्यापक कार्यालयात त्यांनी तब्बल दीड तास उभे केले होते. असे सर्व तक्रार अर्जात महिला शिक्षिकेने नमूद केले आहे. या तक्रारीची प्रत पालकमंत्री उदय सामंत स्थानिक आमदार शेखर निकम यांना ही पाठविण्यात आली आहे. आलेल्या नैराश्याने आपण आपल्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असतील असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अशा निर्ढावलेल्या गट शिक्षणाधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे कोणता धडा शिकवणार हे पाहणे उत्सुकेचे ठरणार आहे. तसेच पालकमंत्री उदय सामंत देखील या प्रकरणावर कोणती भूमिका मांडणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.