(संगमेश्वर /एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्ह्यातील मुचरी गावाच्या औद्योगिक विकासात आज एक सुवर्णक्षण साध्य झाला. मुचरी येथील गवळी वाडी परिसरात एच.डी.एफ.सी. बँक आणि दि प्राईड इंडिया यांच्या संयुक्त सहकार्यातून उभारण्यात आलेल्या ‘संयुक्त मित्र शेतकरी गट’ संचलित काजू फॅक्टरीचा भव्य उद्घाटन सोहळा २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन उपक्रमामुळे मुचरी परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे.
या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ‘दि प्राईड इंडिया’चे प्रोग्राम मॅनेजर श्री. सुबोध नार्वेकर, तांत्रिक सहाय्यक श्री. सचिन रसाळ आणि समूह संघटक श्री. सूरज मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मान्यवरांनी रिबन कापून आणि दीपप्रज्वलन करून फॅक्टरीचे लोकार्पण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी आपली प्रेरक मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सुबोध नार्वेकर म्हणाले की, “ग्रामीण भागात उद्योग सुरू करणे आव्हानात्मक असते, परंतु मुचरीच्या या शेतकरी गटाने ते शक्य करून दाखवले आहे. या फॅक्टरीमुळे केवळ काजूवर प्रक्रिया होणार नाही, तर या भागातील शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य प्रतिष्ठा आणि बाजारपेठ मिळेल.” तांत्रिक सहाय्यक श्री. सचिन रसाळ यांनी तांत्रिक बाजू मांडताना सांगितले की, “येथे आधुनिक पद्धतीचा वापर करून काजू गर काढले जाणार असल्याने गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा जास्तीत जास्त परतावा मिळेल.” तसेच समूह संघटक श्री. सूरज मोहिते यांनी, “शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असा भव्य प्रकल्प उभा करणे ही काळाची गरज असून हे इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे नमूद केले.
संस्थापक अध्यक्ष श्री. विलास सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या प्रकल्पामागची तळमळ स्पष्ट केली. ते म्हणाले, “मुचरी गावातील शेतकऱ्यांची काजू बी विक्रीसाठी होणारी वणवण थांबावी आणि आपल्या मातीत पिकणाऱ्या काजूवर आपल्याच गावात प्रक्रिया व्हावी, या उद्देशाने आम्ही हा प्रकल्प उभा केला आहे. केवळ नफा कमावणे हा आमचा हेतू नसून, शेतकऱ्यांकडून रास्त दरात काजू बी खरेदी करणे आणि ग्राहकांना शुद्ध, दर्जेदार काजू गर उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता असेल. हा प्रकल्प गावाच्या एकीचे प्रतीक आहे.”
या प्रकल्पाच्या उभारणीत उपाध्यक्ष जगन्नाथ गोरे, सचिव धार्मिक मोहिते आणि खजिनदार जनार्दन गुरव यांच्यासह संचालक मंडळातील विकास महाडिक, दत्ताराम भालेकर, किशोर जाधव, सुरेश बारे, विश्वनाथ गोरे, मधुकर जाधव, संतोष जाधव, अमोल भेकरे, प्रमोद सुर्वे, मनोज मोरे, उदय मिरगल, संदीप मिरगल आणि विजय पड्याळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यासह परिसरातील नागरिक, व्यापारी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. फॅक्टरीसाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे श्री. नरेश गवळी आणि सौ. शोभा गवळी यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले. शेवटी, सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

