(संगमेश्वर / एजाज पटेल)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदाच्या निवडणुका जवळ येत असताना संगमेश्वर तालुक्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नुकतेच जाहीर झालेल्या गट व गण आरक्षणानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. तथापि, गटाबाहेरील आणि गणाबाहेरील उमेदवारांना मतदार स्वीकारतील का? हा प्रश्न सध्या तालुक्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उमेदवारीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, काहींच्या अपेक्षेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने काही उमेदवार आता शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, ‘बाहेरचा उमेदवार’ विरुद्ध ‘स्थानिक उमेदवार’ अशी नव्या प्रकारची स्पर्धा उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजकीय समीक्षकांच्या मते, स्थानिक उमेदवाराला मतदारांचा आपुलकीचा आणि ओळखीचा फायदा मिळू शकतो, तर बाहेरच्या उमेदवारांना मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. काही मतदारसंघांमध्ये तगडा स्थानिक उमेदवार नसल्यास, राजकीय पक्षांना बाहेरचे उमेदवार “पार्सल” म्हणून देण्याची वेळ येऊ शकते, असेही बोलले जात आहे.
सध्या काही गट व गणांत इच्छुकांची नावे चर्चेत आली असली तरी, तालुक्यातील अनेक मतदारसंघात अद्याप शांततेचे वातावरण आहे. पक्षनिष्ठा, गटबाजी आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेता उमेदवार निवडणे हे पक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश गट आणि गणांमध्ये बाहेरील उमेदवारांचे नाव समोर येत असले तरी, स्थानिक मतदार अशा उमेदवारांना स्वीकारतील का, हा मुद्दा येत्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

