(देवरूख / वार्ताहर)
कोकणच्या मातीत रुजलेल्या जाखडी, कलगीतुरा, नमन आणि शाहिरी लोककलेला आपल्या भारदस्त पहाडी आवाजाने वेगळी ओळख मिळवून देणारे संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथील ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर यांचे रविवारी वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मुरादपूर येथील राहत्या घरी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कोकणच्या लोककला आणि शाहिरी क्षेत्रातील एक दमदार पहाडी आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
जाखडी आणि कलगीतुरा क्षेत्रात मोठा नावलौकिक
शाहीर आबा खेडेकर हे नाव कलगीतुरा अर्थात जाखडीच्या क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जात होते. वासुदेव मुंगळे घराण्यातील तुरेवाले शाहीर म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. डफावरील गाणी आणि आपल्या भारदस्त, पहाडी आवाजातील वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण ही त्यांची खास ओळख होती.
केवळ चौथीपर्यंत शिक्षण झाले असतानाही उपजत कलागुणांच्या जोरावर त्यांनी लोककला क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी अनेक पदांची रचना केली आणि ती आपल्या खास शैलीत रसिकांसमोर सादर केली. त्यांच्या आवाजातील ताकद आणि सादरीकरणातील सहजता यामुळे कोकणातील लोककलेच्या कार्यक्रमांना त्यांनी वेगळी रंगत आणली.
रत्नागिरी आकाशवाणीवरून पोहोचला आवाज
शाहीर आबा खेडेकर यांनी अनेक वर्षे रत्नागिरी आकाशवाणीवर डफावरील गाणी सादर केली. त्यामुळे त्यांचा पहाडी आवाज केवळ मुरादपूर किंवा संगमेश्वर परिसरापुरता मर्यादित न राहता कोकणातील गावागावांतील आणि असंख्य रसिकांपर्यंत पोहोचला. नमन ही पारंपरिक लोककला घराघरांत पोहोचविण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. जाखडी, कलगीतुरा, नमन, शाहिरी आणि डफावरील गाण्यांची परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली.
लोककलेतून सामाजिक प्रबोधनाचेही कार्य
पारंपरिक लोककलेच्या संवर्धनाबरोबरच सामाजिक प्रबोधनाच्या कार्यातही आबा खेडेकर सक्रिय होते. महाराष्ट्र शासनाच्या साक्षरता व प्रौढ शिक्षण अभियानासह दारूबंदी आणि नशाबंदीच्या उपक्रमांमध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. लोककलेचा प्रभावी वापर करून सामाजिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे ते केवळ लोककलावंत न राहता लोकजागृती करणारे कलाकार म्हणूनही ओळखले जात होते.
‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने सन्मान
चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात तसेच रत्नागिरी येथील पर्यटन महोत्सवात त्यांच्या लोककला क्षेत्रातील योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
आयुष्यभर कोकणच्या लोकपरंपरेची सेवा करणाऱ्या शाहीर आबा खेडेकर यांच्या निधनामुळे जाखडी, कलगीतुरा, नमन आणि शाहिरी लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने कोकणच्या लोककलेतील एक दमदार आवाज आणि समृद्ध परंपरेचा जाणकार कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

