(संगमेश्वर / मिलिंद देसाई)
देवरुख येथील श्री गणेश वेदपाठशाळा यांचा 28 वा वर्धापन दिन यंदाही विविध धार्मिक व ज्ञानवर्धक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 7 ते 9 डिसेंबरदरम्यान भाविकांसाठी कीर्तन, व्याख्यान, याग आणि प्रसादाचा समृद्ध असा कार्यक्रममहोत्सव आखण्यात आला आहे.
७ डिसेंबर रोजी : वर्धापन दिन उत्सवाची सुरुवात 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत प्रसिद्ध कार्पोरेट कीर्तनकार समीर लिमये (कल्याण) यांचे “गुरुसेवा” या विषयावर विशेष कीर्तनाने होणार आहे.
८ डिसेंबर : दुसऱ्या दिवशी गीता उपासनी (पुणे) यांचे “अध्यात्मवादी सावरकर” या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित केले आहे.
९ डिसेंबर : समारोपाच्या दिवशी ह.भ.प. रोहिणी माने परांजपे (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन सादर होणार असून त्यांना तबला साथ केदार लिंगायत व हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन (रत्नागिरी) देणार आहेत.
या तीनही दिवसांत दररोज सकाळी 8 ते 12 या वेळेत श्रीसूक्त याग आणि रात्री 8 ते 9 या वेळेत सर्व उपस्थित भाविकांसाठी भोजन प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
संस्थेमार्फत सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

