(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरालगतच्या गयाळवाडी परिसरातील १६ वर्षीय मुलाचा कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सार्थक सुहास गुरव (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी ग्रुपने पोहण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. या घटनेने गयाळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गयाळवाडी परिसरातील चार ते पाच तरुण रविवारी कारवांचीवाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत सार्थक गुरवही गेला होता. कारवांचीवाडी येथील बंधाऱ्यात पाण्याचा प्रवाह मोठा होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सार्थक बुडाला.
सदर घटना लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तरुण वयातील सार्थकचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

