(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचा (विशिष्ट श्रेणी अंतर्गत) उद्घाटन सोहळा मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी. संकुलात आयोजित करण्यात आला आहे. भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन होणार असून, शिक्षण, संशोधन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुरूप बहुविषयक, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर यांनी दिली.
अवकाश विज्ञानापासून नैसर्गिक शेतीपर्यंत अभिनव अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांना बदलत्या जागतिक परिस्थितीशी स्पर्धा करता यावी आणि त्यांच्यात कौशल्य, आत्मनिर्भरता तसेच संशोधनाची वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने विद्यापीठात पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत विविध अभिनव अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
यामध्ये बी.एस्सी. स्पेस सायन्स, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, बी.एस्सी. नॅचरल फार्मिंग विथ एआय, बी.एस्सी. सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ, एम.एस्सी. क्लिनिकल अँड काउन्सेलिंग सायकॉलॉजी, बी.ए. व एम.ए. दर्शनशास्त्र (IKS आणि संस्कृत), बी.एस्सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विथ एआय आणि एम.एस्सी. अॅडव्हान्स्ड बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, ड्रोन तंत्रज्ञान, मानसिक आरोग्य, भारतीय ज्ञानपरंपरा, जैववैद्यकीय तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती यांसारख्या आधुनिक व उपयुक्त विषयांना अभ्यासक्रमांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
प्रमाणपत्रापासून संशोधन पदवीपर्यंत शिक्षणाची संधी
विद्यापीठाची शैक्षणिक रचना विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री-एक्झिटची सुविधा देणारी असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी तसेच ऑनर्स आणि संशोधन पदवी अशा विविध स्तरांवर शिक्षण घेण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार शिक्षणाचा मार्ग निवडता येणार आहे. कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देतानाच संशोधन व नवोपक्रमासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
उद्घाटन सोहळ्यात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यापीठ गीताचे प्रकाशन तसेच विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक वाटचालीविषयी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य NEP 2020 सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार तसेच मुंबईच्या टाटा मेमोरिअल सेंटरचे माजी शिक्षण संचालक डॉ. श्रीपाद बाणावली यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कोकणातील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी
कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि आधुनिक शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे, संशोधन व कौशल्य विकासाला चालना देणे तसेच उद्योगाभिमुख शिक्षणाची नवी दिशा निर्माण करणे, या उद्दिष्टांवर विद्यापीठाची वाटचाल राहणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

