(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणात फुणगूस खाडीभाग हा नेहमीच प्रभावी मानला जातो. या भागातील डावखोल, पोचरी आणि परचुरी या गावांनी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर तालुक्याच्या नेतृत्वातही आपला ठसा उमटवला आहे. काळानुसार बदल होत गेले, राजकीय समीकरणे बदलली; मात्र खाडीभागातून उभे राहणारे नेतृत्व आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम राहिला आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत परचुरी येथील शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी झालेली निवड ही या परंपरेचीच पुढची कडी मानली जात आहे.
गावपातळीवर घडलेले नेतृत्व
खाडीभागातील नेतृत्वाची खरी ताकद ही ग्रामपातळीवरून घडलेल्या प्रवासात आहे. या भागातील अनेक नेत्यांनी प्रथम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकसेवेची सुरुवात केली, गावाच्या प्रश्नांशी थेट नाते जोडले आणि त्यानंतर तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. सरपंचपदावर काम करताना लोकांशी निर्माण झालेला विश्वास आणि प्रशासनाचा अनुभव याच बळावर त्यांनी पंचायत समितीपर्यंत मजल मारली. हीच परंपरा पुढे सभापतीपदापर्यंत पोहोचली आणि खाडीभागाने तालुक्याच्या नेतृत्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
दिगंबर देसाई: संयम, अभ्यास आणि लोकविश्वास
पोचरी गावचे ज्येष्ठ नेते दिगंबर देसाई हे या परंपरेतील महत्त्वाचे नाव मानले जाते. सन 2002 साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत पंचायत समिती सभागृहात प्रवेश केला. सुरुवातीला सदस्य म्हणून काम करताना त्यांनी तालुक्यातील विकासकामे, प्रशासनाची कार्यपद्धती आणि स्थानिक प्रश्न यांचा सखोल अभ्यास केला.त्यांच्या शांत, संयमी आणि अभ्यासू कार्यशैलीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत 2005 ते 2007 या कालावधीत पंचायत समिती सभापतीपदाची जबाबदारी दिली. सभापती म्हणून काम करताना त्यांनी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवत तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोचरी गावासह संपूर्ण खाडीभागाचा मान उंचावल्याची भावना त्या काळात व्यक्त होत होती.
राजेश मुकादम: आक्रमक नेतृत्वाची छाप
यानंतर खाडीभागातून पुढे आलेले दुसरे प्रभावी नाव म्हणजे डावखोल गावचे राजेश मुकादम. गावच्या सरपंचपदापासून राजकारणाची सुरुवात करत त्यांनी लोकांशी घट्ट नाते निर्माण केले. 2007 साली झालेल्या पंचवार्षिक पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत पंचायत समिती सभागृह गाठले.मुकादम यांना सुरुवातीपासूनच प्रशासनाचा दांडगा अभ्यास असल्याने त्यांच्या कार्यशैलीत आक्रमकता आणि निर्णयक्षमता दिसून येत होती. सदस्य म्हणून काम करताना त्यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली आणि पुढे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत पंचायत समिती सभापतीपदाची संधी दिली.
जरी त्यांचा कार्यकाळ तुलनेने अल्प होता, तरी त्या काळात त्यांनी तालुक्यातील अनेक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत आपली वेगळी छाप उमटवली. त्यांच्या कामगिरीमुळे पुढे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही यश मिळवत जिल्हा परिषद उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली, जे खाडीभागासाठी अभिमानाची बाब मानली गेली.
शर्वरी वेल्ये: परंपरेचा नवा अध्याय
आता या राजकीय परंपरेत परचुरी गावच्या सरपंच शर्वरी वेल्ये यांच्या रूपाने नवे पान जोडले गेले आहे. विशेष म्हणजे त्या मूळच्या पोचरी गावच्या कन्या आणि परचुरी गावच्या सून आहेत. त्यामुळे दोन गावांचा राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकत्र आल्याचे चित्र दिसून येते.यावेळी मात्र परिस्थिती काहीशी वेगळी ठरली. दिगंबर देसाई आणि राजेश मुकादम यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केल्यानंतर पुढे सभापतीपद भूषवले होते. मात्र शर्वरी वेल्ये या निवडणुकीत विजयी होताच त्यांना तत्काळ पंचायत समिती सभापतीपदाची जबाबदारी देत तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे खाडीभागातून उभे राहिलेले हे नवे नेतृत्व तालुक्याच्या राजकारणात नव्या अपेक्षा निर्माण करत आहे.
खाडीभागाचा राजकीय ठसा कायम
वेगवेगळ्या कालखंडात का होईना, पण डावखोल, पोचरी आणि परचुरी या तिन्ही गावांनी पंचायत समितीचे सर्वोच्च पद भूषवले आहे. त्यामुळे फुणगूस खाडीभागाचा तालुक्याच्या राजकारणावर असलेला प्रभाव आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
खाडीभागातील जनतेला नेहमीच आपल्या नेतृत्वाबद्दल भावनिक जिव्हाळा राहिला आहे. आता नव्याने सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या शर्वरी वेल्ये या आपल्या कार्यकाळात विकासाचा कोणता नवा आदर्श घालून देतात, याकडे संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

