(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याचा दावा एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने केला आहे. डिंगणीहून करजुवेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बागवानी कोंड बसथांब्याजवळ सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा वाघ दिसल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. ऋतिक काजरेकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने वाघाचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ऋतिक काजरेकर हा महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी पकडण्याच्या उद्देशाने अंतर्गत रस्त्याने बागवानी कोंड बसथांब्याकडे पायी जात होता. त्यावेळी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी पट्टेरी वाघ बसलेला दिसल्याचे त्याने सांगितले. या प्रसंगात त्याने काही अंतरावरून मोबाईलद्वारे छायाचित्र घेतल्याचा दावा केला आहे. या छायाचित्रामुळे परिसरात वाघाच्या वावराबाबत चर्चा सुरू झाली आहे.
डिंगणी परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे चिंतेत आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावर बिबट्या दिसत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच पट्टेरी वाघ दिसल्याच्या वृत्तामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, कामावर जाणारे नोकरदार, एसटीची प्रतीक्षा करणारे प्रवासी आणि दुचाकीस्वार या मार्गाचा नियमित वापर करतात.
सध्या परिसरात भातकापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी, शेतमजूर आणि महिला पहाटेपासून शेतात कामासाठी जात आहेत. यापूर्वी गवे रेड्यांच्या वावरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना, बिबट्या आणि आता पट्टेरी वाघ दिसल्याच्या दाव्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतीची कामे करताना आणि दैनंदिन प्रवासादरम्यान सुरक्षिततेची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.
या घटनेबाबत ऋतिक काजरेकर याने पत्रकारांशी बोलताना आपण स्वतःच्या डोळ्यांनी हा पट्टेरी वाघ पाहिल्याचे सांगितले. तसेच मोबाईलमध्ये टिपलेले छायाचित्र कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीशिवाय काढले असून ते अस्सल असल्याचा दावाही त्याने केला आहे.
दरम्यान, नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी निर्जन रस्त्यांवरून एकट्याने प्रवास करणे टाळावे. शक्य असल्यास समूहाने किंवा वाहनाने प्रवास करावा. वाघ किंवा अन्य हिंस्र वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला डिवचणे किंवा त्याचा पाठलाग करणे टाळावे.
डिंगणी-करजुवे मार्गावरील बागवानी कोंड परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याच्या दाव्यामुळे तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून वाघाच्या वावराबाबत खातरजमा करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


