( नाशिक )
आयटी क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या Tata Consultancy Services (TCS) मधील कथित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. रविवारी राष्ट्रीय महिला आयोग (NCW) च्या समितीने कंपनीत पाहणी करून पीडित तरुणींशी संवाद साधला. या संवादातून गरिबी आणि कौटुंबिक अडचणींचा गैरफायदा घेत दबाव टाकल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
“कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी सहन केला छळ” – पीडितेची व्यथा
पीडित तरुणींनी आयोगासमोर मांडलेल्या जबाबांनुसार, काहींना कुटुंबातील गंभीर आजारपणामुळे नोकरी टिकवणे अत्यावश्यक होते. एका पीडितेने सांगितले की, वडिलांच्या कॅन्सर उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने वरिष्ठांकडून होणारा मानसिक आणि कथित लैंगिक छळ तिला सहन करावा लागला. नोकरी गमावण्याची भीती आणि घरची जबाबदारी यामुळे ती गप्प राहिल्याचे तिने नमूद केले.
धर्मांतरासाठी दबावाचे आरोप
दुसऱ्या एका पीडितेने नोकरी टिकवण्यासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आणि कुटुंबाचा एकमेव आधार असल्याने तिने सर्व प्रकारचा दबाव सहन केल्याचे सांगितले. या जबाबांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग ने स्वतःहून दखल घेत तपास सुरू केला आहे. पीडितांच्या जबाबांमधून कॉर्पोरेट क्षेत्रातील दबाव, भीती आणि शोषणाचे चिंताजनक चित्र समोर येत असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. पुढील चौकशीत आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. तिच्यावर सध्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असल्याचे समोर आले आहे. ती गर्भवती असल्याने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिकमधील आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कॉर्पोरेट वातावरणातील कर्मचारी सुरक्षा, महिला संरक्षण आणि नैतिकता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चौकशीच्या निष्कर्षांवर पुढील कारवाई अवलंबून राहणार आहे.

