(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. सुनीता शिरभाते या शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आता प्राथमिक शिक्षणाधिकारी या महत्त्वाच्या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे शिक्षण विभागासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सौ. शिरभाते यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनातील शिस्त, निर्णयक्षमतेसह पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले. शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांशी त्यांनी सातत्याने समन्वय राखत काम केले. सर्वसामान्य कर्मचारी व शिक्षकांच्या अडचणी समजून घेत त्या स्वतः पुढाकार घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असत. त्यांच्या या कार्यशैलीमुळे शिक्षण विभागात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
त्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असून, विविध स्तरांवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अद्याप अधिकृत नियुक्ती आदेश जारी झालेला नसला तरी शिक्षण विभागात तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, शिरभाते यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव करण्यात येत आहे. नव्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतचा अधिकृत आदेश येत्या काही दिवसांत अपेक्षित असल्याने या महत्त्वाच्या पदावर अखेर कोणाची वर्णी लागते, याकडे आता शिक्षक, कर्मचारी आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

