(रत्नागिरी /संगमेश्वर प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीनंतर पर्यावरणीय भरपाई म्हणून करण्यात आलेल्या वृक्षलागवडीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने परशुराम ते झारप दरम्यान तब्बल १ लाख ९६ हजार ११२ झाडांची लागवड केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात बहुतांश रोपे सुकलेली अथवा मृतावस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे “वृक्षलागवड की केवळ कागदी पूर्तता?” असा सवाल नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी १ लाख १५ हजार ६१६ झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर नागरिक, सामाजिक संस्था आणि वृक्षप्रेमींनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाने वृक्षलागवडीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार महामार्गाच्या दुतर्फा ९० हजार २३५ तर दुभाजकांमध्ये १ लाख ५ हजार ८७७ अशी एकूण १ लाख ९६ हजार ११२ झाडांची लागवड केल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणीत जिवंत झाडांची संख्या अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी रोपे पूर्णपणे सुकलेली दिसून येत असून, काही ठिकाणी लागवडीचे अवशेषच उरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. देखभाल, नियमित पाणीपुरवठा आणि संगोपनाचा अभाव यामुळे कोट्यवधी रुपयांचा हा उपक्रम अक्षरशः कोमेजल्याची टीका होत आहे.
कोकणातील हवामान आणि मातीशी सुसंगत स्थानिक प्रजातींची झाडे लावावीत, अशी मागणी वृक्षप्रेमींनी पूर्वीपासून केली होती. चिपळूण परिसरात यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला आहे. अयोग्य प्रजातींची निवड, चुकीची लागवड पद्धत आणि त्यानंतरची शून्य देखभाल यामुळे संपूर्ण वृक्षलागवड मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, महामार्गावरील तुरळ परिसरात मंगळवारी भर उन्हात वृक्षलागवड सुरू असल्याचे दिसून आले. अनेक रोपे आधीच कोमेजलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. “पावसाळ्याची प्रतीक्षा न करता भर उन्हात लागवड करण्यामागे नेमका उद्देश काय?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
वाढत्या टीकेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता मृत झाडांच्या जागी आगामी पावसाळ्याच्या मध्यापर्यंत पुनर्लागवड पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. कंत्राटदारांना नवीन खड्डे तयार करणे, दुभाजकांमधील डांबरी व काँक्रीटचा राडारोडा हटवणे, सुपीक माती टाकणे, टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करणे आणि परिसरातील गवत साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र लाखो झाडांची हानी झाल्यानंतर आता नव्याने लावली जाणारी रोपे प्रत्यक्षात जगवली जाणार का, की पुन्हा एकदा केवळ कंत्राटी औपचारिकता पार पडणार, याकडे संपूर्ण पर्यावरणप्रेमींसह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

