(गणपतीपुळे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील श्रींच्या मंदिरात अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा यादरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन आणि सुव्यवस्थित नियोजन करण्यात येते.
यामध्ये दररोज संध्याकाळी 07 ते 07:15 यावेळेमध्ये सर्व विद्युत रोशनाई व लाईट बंद करून फक्त तेल वातीच्या दिवे, समई, पणत्या लावून गर्भगृह तसेच मंदिर परिसर उजळून निघतो, असा हा नयनरम्य श्रींचा आरती व दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी असंख्य भाविक व गणपतीपुळे दशक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित असतात. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते.
अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे मार्फत करण्यात आले आहे अशी माहिती देतानाच सर्वांनी या विहंगम अशा सोहळ्याला उपस्थित राहुन आनंद द्विगुणित करावा अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली.

