(चिपळूण / प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभाग निरीक्षक वारीस खान यांच्या कोकण विभाग दौऱ्याचे मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) चिपळूण येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. सावरकर हॉल येथे झालेल्या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, तळागाळातील जनसंपर्क वाढविणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि आगामी काळात पक्षविस्ताराला गती देणे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षासमोर विविध आव्हाने असली तरी शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी निष्ठा कायम ठेवून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. “कार्यकर्त्यांना जेवढी ताकद लागते तेवढी ताकद मी देत आहे आणि यापुढेही त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे. पक्षाच्या पातळीवर ज्या काही समस्या आहेत, त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही पवार साहेबांना मानणारी माणसं आहोत. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिक काम आजही सुरू आहे आणि यापुढेही ते सुरूच राहील,” असे त्यांनी सांगितले.
तालुका कार्याध्यक्ष शिरीष काटकर यांनी पक्षाने यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना विविध पदे आणि राजकीय संधी दिल्याचे नमूद केले. पक्षाच्या माध्यमातून अनेकांना नगरसेवक, आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सध्या पक्षासमोर आव्हाने असली तरी कोणत्याही परिस्थितीत पक्षाची साथ सोडणार नसल्याचे सांगत पुन्हा त्याच ताकदीने संघटना उभी करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांनी अल्पसंख्यांक विभागाचे काम तळागाळात सुरू असल्याचे सांगितले. हे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी पक्षाकडून संघटनात्मक ताकद आणि मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संवाद साधता यावा तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची पक्षाने योग्य दखल घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली. सुप्रिया सुळे यांच्याकडून वेळ घेऊन जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकर आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर वारीस खान यांनी संबंधित बैठक लवकर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
महिला तालुका अध्यक्षा अस्मिता अडविलकर यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्यास या उपक्रमाला आणखी गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोडवडेकर यांनी महिलांच्या हाताला अधिकाधिक काम उपलब्ध करून देण्यावर पक्षाने भर देण्याची गरज व्यक्त केली. तळागाळातील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांना एकत्र घेऊन सुप्रियाताईंची भेट घडवून आणण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम यांनी मागील दोन वर्षांपासून मृत्यू दाखले प्रलंबित असल्याचा प्रश्न बैठकीत मांडला. त्यामुळे नागरिकांना विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रश्नाची दखल घेत वारीस खान यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रलंबित मृत्यू दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ओबीसी जिल्हाध्यक्ष वासू आप्पा मिस्त्री यांनी आपण सुरुवातीपासूनच शरदचंद्र पवार यांच्या विचारांसोबत असल्याचे सांगितले. मागील काळात काही कारणांमुळे पक्षासाठी अपेक्षित वेळ देता आला नाही; मात्र आता गावागावात जाऊन नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शौकत कादरी यांनी सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याबाबत आपली भूमिका मांडली. “अल्पसंख्यांक असल्याची भावना मला कधीच परकी वाटली नाही. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव माझ्या अनुभवात जाणवला नाही. पक्षाने आम्हाला राजकीय व्यासपीठ आणि काम करण्याची ताकद दिली आहे. आता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपली भूमिका बजावण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
या कोकण दौऱ्यात पक्षाच्या विचारधारेवरील निष्ठा, तळागाळातील संघटन मजबूत करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढविणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि गावागावातील जनसंपर्क वाढविणे यावर विशेष भर देण्यात आला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षासमोर आव्हाने असली तरी निष्ठावान कार्यकर्त्यांची एकजूट, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाची संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘पदापेक्षा पक्ष, परिस्थितीपेक्षा विचार आणि अडचणींपेक्षा संघर्ष मोठा’ या भावनेतून आगामी काळात अधिक जोमाने संघटनात्मक काम करण्याचा संदेश या कोकण दौऱ्यातून देण्यात आला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुरेश शेठ बने, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोडवडेकर, तालुका कार्याध्यक्ष शिरीष काटकर, ज्येष्ठ नेते सतीश आप्पा खेडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, ओबीसी जिल्हाध्यक्ष वासू आप्पा मिस्त्री, ग्रंथालय जिल्हाध्यक्ष दीपक महाडिक, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम, युवक जिल्हाध्यक्ष सूरज शेट्ये, युवती जिल्हाध्यक्षा सानिका पाटेकर, सेवादल जिल्हाध्यक्ष याकूब खान, युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी, विधानसभा अध्यक्ष महेश सावंत, तालुका अध्यक्ष अविनाश केळसकर, महिला तालुका अध्यक्षा अस्मिता अडविलकर, माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष कबीर कादरी, महिला जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद, माजी नगरसेविका सीमा चाळके, नगरसेविका नसरीन खडस, तालुका उपाध्यक्ष मनोहर खेडेकर, महिला शहराध्यक्षा रुकसार अलवी, युवक शहराध्यक्ष मुन्ना जस नाईक, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस रेश्मा काजी, महिला शहर उपाध्यक्षा दीपा कोळेकर, शहर कार्याध्यक्ष इम्तियाज मुकादम, शहर उपाध्यक्ष सत्येंद्रसिंग लोहिया, शहर उपाध्यक्ष रुपेश पालशेतकर, शहर सरचिटणीस संतोष नरळकर, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष ऋषी ताम्हणकर यांच्यासह हनुमंत केदारी, अल्ताफ दळवी, सानिया लोहिया, सादिका आप्पा झोंबडकर, बांदेकर मॅडम, सुजाता व्यवहारे, राधिका तटकरे, दिल नवाज खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


