(गुहागर)
स्वतःच्या मालकीची एअरगन निष्काळजीपणे हाताळणे एका ४५ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. एअरगनची साफसफाई करताना चुकून ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतून सुटलेला छरा थेट त्याच्याच डाव्या खांद्यात घुसला. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील रहिवासी अभिजीत अविनाश कदम (वय ४५) हे आपल्या राहत्या घरी एअरगनची साफसफाई किंवा हाताळणी करत होते. यावेळी त्यांनी एअरगन अत्यंत निष्काळजीपणे हाताळल्याने चुकून ट्रिगर दाबला गेला.
त्यामुळे एअरगनमधून सुटलेला छरा त्यांच्या डाव्या खांद्याला लागला आणि ते जखमी झाले. या निष्काळजी प्रकारामुळे स्वतःसोबतच इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शंकर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात अभिजीत कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर शस्त्रास्त्रे किंवा एअरगनसारखी साधने हाताळताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. निष्काळजीपणामुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात आणि त्यातून गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

