(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या कथित रॅकेटविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत कदमवाडी रोडवरील ‘प्रतिमा हॉस्पिटल’ येथे छापा टाकला. या कारवाईत माजी सिव्हिल सर्जन डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी सुमारे 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या कारवाईमुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी डॉक्टर, एजंट आणि संबंधित व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत करवीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा कथित रॅकेट उघडकीस आला.
असा रचला पोलिसांनी सापळा
काही दिवसांपूर्वी करवीर पोलिसांनी कळंबा येथील **’थ्री स्टार लॉज’**वर छापा टाकून संशयित स्वप्नील पाटील याला अटक केली होती. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी शिंदे ही एजंट म्हणून काम करत होती. गर्भात मुलगी असल्याचे सांगण्यात आलेल्या महिलांना ती कदमवाडीतील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवत असल्याचे तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने डमी रुग्ण तयार करून हॉस्पिटलमध्ये पाठवला.
डमी रुग्णाच्या माध्यमातून रंगेहाथ कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड यांनी कोणतीही अधिकृत कागदपत्रे न घेता डमी रुग्णाला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी करून गर्भपाताची तयारी केली आणि संबंधित महिलेला गर्भपातासाठी औषधे दिली. याचवेळी बाहेर पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी छापा टाकत डॉ. गायकवाड यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आणि विविध वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
माजी वरिष्ठ आरोग्य अधिकारी अडचणीत
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. चंद्रकांत गायकवाड यांनी यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि बीड जिल्ह्यांमध्ये सिव्हिल सर्जन म्हणून सेवा बजावली होती. तसेच ते मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात अतिरिक्त अधीक्षक आणि पुणे येथे सहायक संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम तसेच पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेची प्रक्रिया सुरू असताना डॉ. गायकवाड यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आणखी डॉक्टर आणि एजंट तपासाच्या रडारवर
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, डॉ. मदने आणि करवीर गुन्हे शोध पथकाने केली. या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टर, एजंट किंवा इतर व्यक्ती सहभागी आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

