(रायगड)
पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा प्रमुख आंबेनळी घाट मार्ग येत्या १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच, रात्रीच्या वेळी आणि हवामान खात्याकडून रेड अथवा ऑरेंज अलर्ट जाहीर झाल्यास सर्व प्रकारची वाहतूक या मार्गावरून बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
गेल्या काही दिवसांत आंबेनळी घाट परिसरात जोरदार पावसामुळे सात ते आठ ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दुर्घटनेचा धोका वाढला आहे. याआधी घाटमार्गावर दरड कोसळल्यामुळे पाच दिवसांसाठी तात्पुरती वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता पावसाळा पूर्णपणे ओसरूपर्यंत अवजड वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयानुसार, हवामान खात्याकडून रेड किंवा ऑरेंज अलर्ट असल्यास हलकी वाहने देखील आंबेनळी घाटातून जाऊ शकणार नाहीत. दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या काळात या मार्गावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. नागमोडी वळणे, खोल दऱ्या आणि अरुंद रस्ता या घाटाच्या वैशिष्ट्यांमुळे अतिवृष्टीत दुर्घटनांचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर महाडच्या पोलादपूर प्रांताधिकारी कार्यालय आणि रायगड पोलीस प्रशासनाच्या शिफारशीनुसार वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना काढण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यंत्रणेला याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यायी मार्गांची व्यवस्था :
- महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक आता माणगाव – ताम्हिणी घाट – पुणे – सातारा मार्गे वळवली जाणार आहे.
- कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक चिपळूण – पाटण – सातारा मार्गे वळवण्यात येणार आहे.
प्रशासनाचा इशारा :
कोकणातून महाबळेश्वरकडे जाण्याचा विचार करत असाल, तर हवामान खात्याच्या सूचनांचा अवश्य विचार करा. विशेषतः रात्रीचा प्रवास टाळावा आणि हवामानाच्या परिस्थितीनुसारच घाटमार्ग वापरावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना केले आहे.