(नाशिक)
बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिच्यासह आरोपी तौसीफ आत्तार यालाही न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज नाशिकरोड न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या आरोपांमुळे गाजले प्रकरण
नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने सहकाऱ्यांविरोधात कथित धर्मांतर, धार्मिक दबाव आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात निदा खानला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर ती गर्भवती असल्याचे सांगत तिने एका आठवड्यानंतर जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेवर विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला तसेच तिच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एसआयटीच्या तपासात काय समोर आले?
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सादर केलेल्या तपासात काही महत्त्वाचे दावे नोंदवले आहेत. तपासानुसार, पीडित महिलेला धार्मिक व्हिडिओ, साहित्य आणि संदेश सातत्याने पाठवण्यात आले. तिला नमाज पठण करण्यास, बुरखा परिधान करण्यास आणि धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तिचे नाव बदलून ‘हनिया’ ठेवण्यात आल्याचाही आरोप तपासात नमूद करण्यात आला आहे.
चार्जशीटमधील गंभीर आरोप
पोलिसांच्या चार्जशीटनुसार, आरोपी दानिश शेख, तौसीफ आत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. चार्जशीटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पीडितेला 2020 मध्ये टीसीएसमध्ये नोकरी मिळवून दिल्यानंतर तिच्यावर धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्य आरोपी दानिश शेख याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा, जातीवाचक अपमान करून मानसिक छळ केल्याचा तसेच तिच्याकडून मोठी रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेतल्याचाही आरोप आहे. याशिवाय, पीडितेच्या मोबाईलमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध धार्मिक अॅप डाउनलोड करून धार्मिक व्हिडिओ आणि साहित्य पाहण्यास भाग पाडल्याचा तसेच नमाज आणि रोजा पाळण्यासाठी दबाव आणल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.
‘हनिया’ नावाने 9 हजार रुपयांची जकात भरल्याचा दावा
एसआयटीने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल 2025 रोजी पीडितेच्या नावात बदल करण्यासाठी इंटरनेटवर नावाचा शोध घेण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे कथितपणे नाव बदलून ‘हनिया’ करण्यात आले. तपास यंत्रणेनुसार, या बदललेल्या नावाने 9 हजार रुपयांची जकात भरल्याचे पुरावेही तपासादरम्यान समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

