(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या यामिनी हार्डवेअर अँड सेल्स या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत दुकानाचे गोडाऊन जळून खाक झाले आहे. तर सीएनजी असलेली नवीन इको गाडी या आगीत जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. खंडाळा येथील नामांकित व्यवसायिक मोहनलाल चौधरी यांच्या मालकीचे हे यामिनी हार्डवेअर दुकान आणि इको कंपनीची गाडी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आगीच्या घटनेमुळे चौधरी यांचे सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आज रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हार्डवेअर दुकान उघडल्यानंतर दुकानाला आग लागल्याची घटना दुकानातील कामगारांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब आपल्या मालकांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी जिंदल कंपनीचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्यात यश आले आहे. परंतु या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याकडून करण्यात आला असून अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी विलास दीडपिसे आणि हेडकॉन्स्टेबल मंदार मोहिते करीत आहेत.

