(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरात आणि परिसरात चोऱ्या व गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सदोष सीसीटीव्ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. रत्नागिरी शहरात लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा सध्या नादुरुस्त अवस्थेत असून, ती सक्षम ठेकेदारामार्फत पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील वाढते शहरीकरण, रेल्वेमार्गे होणारी नागरिकांची ये-जा आणि स्थलांतर यामुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था बळकट करणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषद तसेच परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या हौसिंग सोसायट्या व खाजगी आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात यावे, अशी सूचना देखील मनसेने केली.
या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. बगाटे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.
उपस्थित मान्यवर :
रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री. गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक श्री. अमोल श्रीनाथ, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, श्री. सौरभ पाटील, उपशहर अध्यक्ष श्री. राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष श्री. सोम पिलणकर, श्री. मुन्ना शेलार आणि श्री. आकाश फुटक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.