(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील कडवई रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या तीन वर्षांपासून दुरवस्था झाली असून, खड्डे आणि दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. वारंवार मागणी करूनही कोकण रेल्वे प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कडवई येथील रिक्षा संघटना आक्रमक झाली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सुमारे सहा वर्षांपूर्वी कडवई रेल्वेस्थानक अस्तित्वात आले. मात्र, स्थानक सुरू होऊन इतका कालावधी उलटला तरी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप कायम आहे. स्थानकाला प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, सध्या दिवा-रत्नागिरी ही एकमेव पॅसेंजर गाडी येथे थांबते. याशिवाय अन्य गाड्या क्रॉसिंगसाठी थांबत असल्याने त्यांचाही प्रवासी लाभ घेतात. त्यामुळे या स्थानकातून कोकण रेल्वेला उत्पन्न मिळत असतानाही सुविधांच्या बाबतीत मात्र उदासीनता असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
पिण्याच्या पाण्यासह अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असताना आता स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडी वाढल्याने वाहनचालकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि रेल्वे प्रवाशांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, स्थानकाच्या सुविधांबाबत तसेच काही गाड्यांना कडवई येथे थांबा मिळावा, यासाठी मनसेच्या वतीने नुकतेच कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत स्थानिक रिक्षा संघटनेने आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे. आता कोकण रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम हाती घेणार की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे कडवई पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


