(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात विनापरवाना गोवंशीय मांसाची वाहतूक व विक्रीसाठी साठा केल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत दुचाकीसह एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी ४.५५ वाजण्याच्या सुमारास लांजेकर नगर, उद्यमनगर येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) हा विनापरवाना गोवंशीय मांसाची वाहतूक करत असल्याचा तसेच विक्रीच्या उद्देशाने मांसाचा साठा बाळगत असल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ५१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे गोवंशीय मांस, होंडा अॅक्टिव्हा दुचाकी (क्र. एमएच-०८ एझेड-६४८५) तसेच टाटा व्होल्टास कंपनीचा डीप फ्रीझर असा एकूण १,०६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम, २०१५ मधील कलम ५(ब), ५(क), ९(अ) आणि मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ६६(१) व १९२(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

