(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यात शनिवारी सायंकाळी धडकलेल्या वादळाने करबुडे येथील बौद्धवाडीला मोठा तडाखा दिला. अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यांमुळे आणि धुळीच्या वादळामुळे काही काळ परिसरातील वातावरण पूर्णपणे धूसर झाले. या नैसर्गिक संकटात बौद्धवाडीतील सहा घरांचे नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये वादळाने भीतीचे वातावरण आता निर्माण केले आहे.
सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले, तर काही घरांच्या छतांचेही नुकसान झाले आहे. ग्रामस्थ अनिल जाधव यांच्या घराचे छत उडाल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या वादळात प्रकाश केरू जाधव, अजित देवराम जाधव, संतोष यशवंत जाधव, रवींद्र केशव जाधव, संजय भिकाजी जाधव आणि संदीप यशवंत जाधव यांच्या घरांनाही फटका बसला आहे. काही घरांचे मोठ-मोठे पत्रे उडून उघड्या भिंती पडल्याचे चित्र दिसून येत आहे. यातून भिंती आणि छपरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
वादळाच्या तडाख्यात करबुडे बौद्धवाडीतील विद्युत यंत्रणेलाही मोठा फटका बसला असून मेन वीजवाहिनी तुटून ती ग्रामस्थ अनिल जी. जाधव यांच्या घराच्या अड्यावर धोकादायक अवस्थेत अडकून पडली आहे. वादळ सुरू झाल्यापासून परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. दरम्यान, शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास वीज विभागाकडून काही भागातील विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यात आला. मात्र, बौद्धवाडीतील बारा ते पंधरा घरे अद्यापही अंधारातच असून उर्वरित वाडीतील घरांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र काही घरे अंधारात असल्यामुळे ग्रामस्थांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी तसेच महावितरणने वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करावा, आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महावितरणकडून खंडित वीजपुरवठा नेमका कधी पूर्ववत केला जाणार, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक वादळात बौद्धवाडीच ठरते संकटाचे केंद्र
गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारच्या वादळाने बौद्धवाडीला मोठा तडाखा दिला होता. त्या वेळी अनेक घरांचे नुकसान झाले होते, तर काही कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याचा आधार घ्यावा लागला होता. त्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्तांची पाहणी केली होती. विशेष म्हणजे, त्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने लोकप्रतिनिधींनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला होता. नुकसानग्रस्त कुटुंबांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. वादळाचा धोका वारंवार निर्माण होत आहे. यामधून प्रत्येक वेळी निसर्गाच्या तडाख्यात बौद्धवाडीतील नागरिकांचेच मोठे नुकसान होत असल्याचे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.

