(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम फोडून रोकड लुटण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केल्याने मंगळवारी पहाटे परिसरात खळबळ उडाली. पहाटेच्या सुमारास एटीएममध्ये छेडछाड करून मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र चोरट्याच्या हाती रोकड लागली नसल्याची माहिती आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.५३ वाजता अज्ञात इसम हातखंबा येथील एसबीआय शाखेच्या इमारतीत असलेल्या एटीएममध्ये शिरला. त्याने एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून ते फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास बँकेतील एका सहकाऱ्याने शाखा व्यवस्थापक शीतल रमाकांत शिंदे यांना दूरध्वनीवरून एटीएम मशीन कोणीतरी फोडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच शिंदे यांनी तातडीने बँकेत धाव घेत पाहणी केली. त्यावेळी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी शाखा व्यवस्थापक शीतल शिंदे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक १६७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम ३३४(१) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली असून, संशयिताची हालचाल, येण्याचा आणि जाण्याचा मार्ग याचा मागोवा घेण्यात येत आहे. तसेच या घटनेमागे एकटाच चोरटा होता की टोळीचा सहभाग आहे, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करूनही रोकड लुटण्यात चोरट्याला यश आले नसले, तरी पहाटेच्या वेळी बँकेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला चोरट्याने दिलेले हे आव्हान गंभीर मानले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आता ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

