(संगमेश्वर / प्रतिनिधी)
उत्तर अमेरिकेतील मराठी भाषिकांना एकत्र आणणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (BMM) २२ वे चार दिवसीय संमेलन येत्या ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान अमेरिकेतील सिएटल कन्व्हेन्शन सेंटर येथे उत्साहात पार पडणार आहे. या भव्य संमेलनाला उत्तर अमेरिकेतील विविध भागांतून सुमारे २,५०० मराठी बांधव उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय सैन्याच्या वैद्यकीय दलात तब्बल ३७ वर्षे सेवा बजावलेल्या ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच चाणक्य प्रतिष्ठानचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी, लेखक निलेश ओक आणि ज्येष्ठ क्रीडा समालोचक सुनंदन लेले यांची विशेष व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत.
संमेलनात उत्तर अमेरिकेतील विविध मराठी मंडळांकडून एकांकिका, नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, ढोल-ताशा स्पर्धा, पैठणी फॅशन शो, स्टँड-अप कॉमेडी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. तसेच गायक आणि एकांकिका स्पर्धांच्या प्राथमिक फेऱ्यांतील विजेत्या संघांमध्ये अंतिम फेरीची रंगतदार स्पर्धा होईल.
महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आणि वक्त्यांचाही या संमेलनात सहभाग असणार आहे. डॉ. संजय उपाध्ये यांचा ‘घर करा रे प्रसन्न आणि चोवीस तास बिनधास्त’ हा प्रेरणादायी कार्यक्रम, सलील आणि शुभंकर कुलकर्णी यांचा मुलांसाठी विशेष संगीत कार्यक्रम, ‘ऑल द बेस्ट’, ‘फोक आख्यान’ ही नाटके तसेच प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘नाटकातले नाटक’ हा कार्यक्रमही संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र आणि अमेरिकेतील उद्योजकांसाठी भव्य व्यावसायिक प्रदर्शन व विक्री कक्ष उभारण्यात येणार आहे. यामध्ये ग्रंथाली, बांधकाम व्यावसायिक, पर्यटन संस्था, दागिने विक्रेते, मराठी खाद्यपदार्थ उत्पादक, वस्त्रव्यवसायिक, विमा कंपन्या तसेच विविध धर्मादाय संस्थांचा सहभाग असेल.
उत्तर अमेरिकेतील मराठी साहित्याला चालना देण्यासाठी गेल्या दोन वर्षांत पुस्तके प्रकाशित झालेल्या मराठी लेखकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्यांची रंगमंचावर ओळख करून देण्यात येईल. तसेच त्यांच्या पुस्तकांची विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
या संमेलनाच्या नियोजनाबाबतची माहिती अमेरिका स्थित लेखक, संपादक आणि उद्योजक मोहन रानडे यांनी दिली. मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि कला यांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

