(संगमेश्वर)
मोबाइल फोनमध्ये चुकून फोटो टिपल्याच्या रागातून एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एका महिलेसह उमेश घाणेकर आणि दिनेश घाणेकर या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार रामचंद्र गोताड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा आणि संशयित आरोपींचा जमीनविषयक वाद काही काळापासून सुरू आहे. ८ ऑक्टोबर रोजी गोताड हे माखजन बाजारात खरेदीसाठी गेले असता त्यांच्या मोबाइलमध्ये उमेश घाणेकर यांचा फोटो चुकून टिपला गेला. या किरकोळ कारणावरून उमेश आणि दिनेश घाणेकर यांनी गोताड यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आता पुढील तपास संगमेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.

