(राजापूर / तुषार पाचलकर)
पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या शेतात कुटुंबातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण एकत्र उतरून भातलावणी करत असल्याचे दृश्य आज दुर्मिळ होत चालले आहे. मात्र राजापूर तालुक्यातील तळवडे गावातील पत्रकार सुरेश गुडेकर यांचे कुटुंब आजही शेतीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानत परंपरा जपत आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेश गुडेकर यांनी आपल्या आवडीमुळे पत्रकारिता व्यवसाय स्वीकारला असला, तरी आपल्या मातीतली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. शेतीच्या प्रत्येक हंगामात ते कुटुंबीयांसोबत शेतात उतरून श्रमदान करतात. त्यांच्या कुटुंबासाठी शेती हा केवळ व्यवसाय नसून संस्कार, परंपरा आणि जीवनशैली आहे.
सध्या भातलावणीच्या हंगामात संपूर्ण गुडेकर कुटुंब चिखलात उतरून रोपांची लागवड करत आहे. घरातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही या कामात उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करतानाच पारंपरिक शेतीपद्धतीचाही समतोल त्यांनी जपला आहे. गुडेकर कुटुंब केवळ भातशेतीपुरते मर्यादित नसून वर्षभर फळबाग, फुलशेती, विविध वृक्षांची लागवड तसेच बारमाही शेती करत असते. पर्यावरणपूरक शेती, मेहनत आणि कुटुंबातील एकोप्याच्या बळावर त्यांनी शेतीची समृद्ध परंपरा कायम ठेवली आहे.
आज अनेक तरुण शेतीपासून दूर जात असताना तळवडे येथील गुडेकर कुटुंबाचा आदर्श प्रेरणादायी ठरत आहे. श्रमाची प्रतिष्ठा, मातीशी असलेले नाते आणि शेतीबद्दलची आत्मीयता यामुळे हे कुटुंब परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहे. छायाचित्रात गुडेकर कुटुंबातील सर्व सदस्य चिखलात उतरून भातलावणी करताना दिसत असून, शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून कुटुंबाला एकत्र बांधणारा संस्कार असल्याचा संदेश हे चित्र प्रभावीपणे देत आहे.

