(नाणीज / वार्ताहर)
रत्नागिरीतील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाच्या वातावरणात अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मुसळधार पावसाची पर्वा न करता महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा आणि छत्तीसगडसह विविध राज्यांतून लाखो भाविक नाणीजधामात दाखल झाले. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या भव्य गुरुपूजन सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
पहाटेपासूनच सुंदरगड परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी साडेआठ वाजता मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होणार असला तरी अनेक भाविक पहाटेपासूनच पूजेचे साहित्य, गुरुप्रतिमा आणि फुलांची आरास घेऊन आपल्या जागी विराजमान झाले होते. संपूर्ण परिसरात “जय गुरुदेव” च्या घोषणांनी आणि भक्तिमय वातावरणाने एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती.
जगद्गुरूंच्या आगमनाने भक्तांमध्ये उत्साह
गुरुपूजन सोहळ्यापूर्वी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरासह विविध देवस्थानांचे दर्शन घेतले. संतपीठावर आगमन होताच सुवासिनींनी औक्षण करून त्यांचे पारंपरिक स्वागत केले. टाळ्यांचा कडकडाट, जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात त्यांनी उपस्थित लाखो भाविकांना आशीर्वाद दिला. यानंतर वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपूजन विधीला प्रारंभ झाला.
एकाच वेळी लाखो भाविकांकडून सामूहिक गुरुपूजन
संतपीठावरून सांगितल्या जाणाऱ्या मंत्रोच्चारांनुसार लाखो भाविकांनी एकाच वेळी गुरुपूजन केले. हळद-कुंकू, पुष्पार्पण, निरांजन, घंटानाद आणि औक्षणामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सामूहिक पूजाविधी सुरू होता. सुंदरगड परिसरात जिकडे तिकडे भक्तांचा महासागरच पाहायला मिळत होता. या प्रसंगी सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरीताई, देवयोगी यांच्यासह जगद्गुरूंच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. गुरुपूजनानंतर जगद्गुरूंनी भाविकांना संबोधित करत, “आजची गुरुपौर्णिमा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येवो,” असा मंगल आशीर्वाद दिला.
सप्त चिरंजीव महामृत्युंजय यागाची सांगता
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या सप्त चिरंजीव महामृत्युंजय यागाची सांगता गुरुवारी दुपारी करण्यात आली. संपूर्ण यागाचे पौरोहित्य वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांनी केले. यानंतर चरणदर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला. जगद्गुरूंच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रोषणाई, फुलांची सजावट आणि महाप्रसादाचा लाभ
गुरुपौर्णिमेनिमित्त संतपीठ, मुख्य मंदिरे आणि सुंदरगड परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर, वरदविनायक मंदिर तसेच इतर देवस्थानांमध्ये दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.
हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. पिण्याचे शुद्ध पाणी, वैद्यकीय सेवा, विश्रांती व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
शिस्तबद्ध नियोजनाचे सर्वत्र कौतुक
लाखो भाविकांची उपस्थिती असूनही संपूर्ण सोहळा अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडला. स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, दर्शनरांगा आणि भाविकांना आवश्यक मार्गदर्शन प्रभावीपणे हाताळले. त्यामुळे कुठेही गोंधळ किंवा गैरसोय झाली नाही. उपस्थित भाविकांनी संस्थानच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.
वाहनांच्या मोठ्या रांगा, तरीही वाहतूक सुरळीत
महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने नाणीज परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, विस्तारीत राष्ट्रीय महामार्ग आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थेमुळे वाहनांची ये-जा सुरळीत सुरू होती. राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
उत्सवादरम्यान स्थानिक व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि लघुउद्योजकांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नाणीजधामात श्रद्धा, सेवा आणि आध्यात्मिकतेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

