(रत्नागिरी / प्रतिनिधी)
एस.टी. महामंडळाच्या प्रवाशांसाठी पूर्वी फक्त ऑफलाइन तिकीट बुकिंगचीच सुविधा उपलब्ध होती. मात्र, मुंबई, पुणे यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा सुरू केली. या सुविधेला राज्यभरातून, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या नव्या डिजिटल योजनेतून प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून सहजपणे तिकीट बुक करता येत आहे. त्यामुळे ऑफलाइन बुकिंगसोबतच ऑनलाईन बुकिंगमधूनही एस.टी. महामंडळाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.
प्रवाशांना अधिक सोयीसाठी www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच MSRTC Bus Reservation या मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करता येते. तांत्रिक अडचणींसाठी २४ तास कार्यरत असलेला 7738087103 हा हेल्पलाइन क्रमांक आणि पेमेंट संदर्भातील तक्रारींसाठी 0120-4456456 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एस.टी. महामंडळाने प्रवाशांना या ऑनलाईन प्रणालीचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले असून, तांत्रिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.