(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी हातखंबा ते रेल्वे स्टेशन या दरम्यान उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या डायव्हर्जनमुळे वाहनचालकांसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अपुऱ्या सूचनाफलकांमुळे आणि वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटींमुळे या मार्गावर अपघातांचा धोका वाढला असून, ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः जिल्ह्याबाहेरून कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनचालकांना या मार्गावरील बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा अंदाजच येत नसल्याचे चित्र आहे. कुठे वळायचे, कोणता मार्ग खुला आहे आणि कोणता बंद आहे, याची स्पष्ट माहिती नसल्याने अनेक वाहनचालक गोंधळून जातात. परिणामी, अचानक लेन बदलणे, चुकीच्या दिशेने वाहन वळविणे किंवा रस्त्याच्या मध्यभागी थांबणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. रस्ते कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित असते. त्यासाठी पुरेशा अंतरावर दिशादर्शक फलक, इशारे, परावर्तित चिन्हे आणि प्रकाशव्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट कंपनी या मूलभूत बाबींनाच बगल देत असल्याचा आरोप वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असताना वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे केलेले दुर्लक्ष गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. मिऱ्या नागपूर महामार्गावर छोटे- मोठे अपघातांचे सत्र सुरूच आहे. महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या हलगर्जीपनामुळे अपघाती घटनांमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. छोटा अपघातही गंभीर स्वरूप धारण करतो आणि त्यातून जीवितहानी होते अशा वेळी ठेकेदार कंपनीचे अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी दिसत नाहीत; मात्र त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागते. वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदार कंपनीला आवश्यक दिशादर्शक फलक, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कारवांचीवाडी ते महालक्ष्मी स्टॉप; चालकांचा रोजचा गोंधळ
कारवांचीवाडी येथील डायव्हर्जन परिसरात रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनते. अपुऱ्या सूचनांमुळे वाहनचालकांना मार्ग समजण्यास अडचणी येतात. त्यानंतर महालक्ष्मी स्टॉप परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मार्गिकेकडे वाहतूक वळविण्यात आली असली, तरी तेथेही स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव असल्याने अनेक वाहने डाव्या बाजूला वळण्याकडे दुर्लक्षित होत असून त्याच अरुंद मार्गावरून पुढे जात असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका कायम असतो.
रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातील परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. रेल्वे स्टेशनकडे जाणारी आणि स्टेशनमधून बाहेर पडणारी वाहने मुख्य मार्गावर थेट येत असल्याने वाहतुकीचा ताण वाढत आहे. महामार्गाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या असल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. परिणामी, अपघाताची शक्यता वाढत असून, एसटी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडी आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

