(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, वांद्री येथे आज (शनिवारी, १२ सप्टेंबर) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अर्टिगा कार आणि मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपची जोरदार धडक झाली. वांद्री येथील नवीन पुलाच्या मागील बाजूस झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. धडकेनंतर बोलेरो पिकअप रस्त्यावर पलटी झाली. अपघाताची तीव्रता पाहता मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दोन्ही वाहने वेगाने एकमेकांवर आदळल्याने जोरदार आवाज झाला. धडकेमुळे बोलेरो पिकअपच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर अर्टिगा कारच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर वाहनांचे सुटे भाग आणि चुराडा महामार्गावर पसरला होता. त्यामुळे अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत होती.
या अपघातात कणकवली येथील ६२ वर्षीय लतिका लक्ष्मण सावंत, मालवण येथील २४ वर्षीय आकाश विठोबा ढोलम आणि ३८ वर्षीय प्रशांत विश्वनाथ कोंडगावकर हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रत्यक्षदर्शींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिघांनाही घरी सोडण्यात आले.
या अपघातात अर्टिगा कार क्रमांक MH 02 GP 2291 आणि मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक MH 08 AP 2019 यांचे मोठे नुकसान झाले. धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्यभागी अडकून पडल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
दरम्यान, या अपघाताबाबत संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेतली असता, अपघाताची पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


