( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
तालुक्यातील पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याशेजारी थिबा राजा कालीन जागेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. थिबा राजाने स्थापन केलेली बुध्द मूर्ती स्थलांतरित करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित झाली होती. या वृत्ताने बौद्ध समाजामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. थिबा राजाकालीन बुद्धमूर्ती अन्यत्र स्थलांतरित करू नये या मागणीचे भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केल्यानंतर शुक्रवारी, ( दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी) भीम युवा पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेवर धडक दिली. पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कम्युनिटी सेंटरचे होऊ घातलेले कामकाज थांबवून बुध्द मुर्तीचे स्थलांतर न करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि.१७/१२/२०२४ च्या प्रसारित झालेल्या वर्तमान पत्रातील बातमीनुसार असे निर्दशनास येत आहे की, थिबा राजा कालिन बुध्दमुर्तीजवळ DSP बंगल्याशेजारील जागेत कम्युनिटी सेंटरचे बांधकाम करण्याचे योजिले असून त्यासाठी तेथील बुध्दाची मुर्ती हलविण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी एका चॅरिटेबल ट्रस्टला पाचारण करण्यात येऊन बैठक घेतली जाणार आहे. मुळात ज्या ट्रस्टला आपण बैठकीसाठी निमंत्रीत केले आहे. ती बौध्द समाजात समाज मान्य नसलेली ट्रस्ट आहे. त्याचबरोबर तालुक्यातील, जिल्ह्यातील तमाम बौध्दबांधवांना बुध्दमुर्तीच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर नव्हे तर बौध्दविहार बांधावयाचे आहे. सदर जागा शासनाने देखील बौध्दविहारासाठी राखीव जागा म्हणून घोषित केलेली आहे. दि.०२/०३/२०१४ रोजी तालुक्यातील, जिल्ह्यातील धार्मिक संघटना दि. बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बौध्दजन पंचायत समिती व भारतीय बौध्द महासभा (मिराताई आंबेडकर प्रणित) यांनी संयुक्त बैठक घेऊन सदर जागा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ताब्यात मिळावी असा ठराव करुन शासन दरबारी सादर केला होता. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भावना दुखावण्याचे काम चालू केल्याचा आरोप
यापुढे, ती जमिन ताब्यात मिळाल्यानंतर सदर जागेत बौध्दविहाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. असे असताना नगर परिषद प्रशासनाने समाजविरोधी असलेल्या चॅरिटेबल ट्रस्टला हाताशी धरुन बौध्द विहाराच्या ऐवजी कम्युनिटी सेंटरचे बांधकाम करुन तेथील बौध्द विहाराचे अस्तित्व संपुष्टात आणून बौध्द बांधवांच्या भावना दुखावण्याचे व भडकावण्याचे काम चालू केले आहे असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
गंभीर परिणाम भोगावे लागतील….
तसेच समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष करुन जर तेथील बुध्द मुर्तीला स्थलांतर करण्यासाठी साधा हात जरी लावला तरी त्याचे गंभीर परिणाम नगर परिषद प्रशासनास भोगावे लागतील आणि त्यानंतर समाजामध्ये उद्रेक निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार राहील अशी सूचना वजा इशारा निवेदनातून भीम युवा पँथर संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन सादर करताना भीम युवा पँथरचे अध्यक्ष अमोल जाधव, कार्याध्यक्ष किशोर पवार, सरचिटणीस नरेश जाधव, रुपेश कांबळे, सौरभ आयरे, समीर जाधव, तुषार जाधव धीरज पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.