(मुंबई)
ग्रामीण भागात तर मुलींच्या कमतरतेमुळे हजारो तरुण वयाची पस्तीशी ओलांडूनही अविवाहित राहत आहेत, तरीही सरकारचे या सामाजिक समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळुंके यांनी विधानसभेत केला. लग्नाळू युवकांची होणारी आर्थिक लूट आणि त्यांच्या वाढत्या नैराश्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर बोलताना सोळुंके यांनी लग्नाच्या बाजारातील भीषण वास्तव मांडले. सध्या विवाहासाठी उलट हुंडा देण्याची वेळ मुलांवर आली आहे, तर दुसरीकडे बोगस मुलींच्या मदतीने लग्न लावून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. एकाच मुलीचे अनेक ठिकाणी विवाह लावून लाखो रुपये उकळण्याचे फसवणुकीचे प्रकार राज्याच्या ग्रामीण भागात फोफावले आहेत. या दुष्टचक्रामुळे युवकांचे संसार तर उभे राहत नाहीतच, उलट त्यांची आयुष्यभराची पुंजी वाया जात आहे. या विवंचनेतून युवकांमध्ये नैराश्य आणि व्यसनाधीनता वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी, ही समस्या वास्तवदर्शी असल्याचे मान्य करत यावर धोरणात्मक उपाययोजना आणि विशेष योजनांचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
लुटारूंचे जाळे
ग्रामीण भागात लग्नाच्या अभावामुळे निर्माण झालेली पोकळी काही भामटे संधी म्हणून वापरत आहेत. लग्नासाठी मुलगी उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने अडीच ते तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. काहींना तर मुलींना हुंडा देण्याची वेळ येत आहे. यानंतरही अनेकदा लग्न लावून काही दिवसांतच मुलगी दागिने आणि पैसे घेऊन पसार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे युवकांचे संसार तर उभे राहत नाहीतच, पण आयुष्याची पुंजीही वाया जात आहे. सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी सरकारला पावले उचलण्याची गरज आहे, याकडे आ. सोळंके यांनी लक्ष वेधले आहे.

