(दापोली)
तालुक्यातील उंबर्ले बौद्धवाडी येथे गाईच्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी सुशिल बबन जाधव (वय ४३) यांच्या गोठ्यातून तब्बल २० हजार रुपये किमतीची गाभण गाय अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजेपासून ते ९ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली. फिर्यादींची वहिणी सौ. प्रशिका या रोजच्या प्रमाणे गाईची साफसफाई करण्यासाठी गोठ्यात गेल्या असता साहिवाल (क्रॉस) जातीची, तांबड्या-पांढऱ्या रंगाची, पाच वर्षांची गाभण गाय गोठ्यातून गायब असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यात गु.र.नं. १६६/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेतकऱ्यांची कष्टाने जोपासलेली जनावरेच चोरट्यांच्या निशाण्यावर येत असल्याने परिसरातील शेतकरी वर्गात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

