(चिपळूण/रत्नागिरी प्रतिनिधी)
रस्ता ओलांडत असलेल्या पिता-पुत्राला भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका ते चिंचनाका मार्गावर २५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या अपघातात अमोल सहदेव वडार आणि त्यांचा मुलगा दुर्वांश अमोल वडार हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर दुचाकी घटनास्थळीच सोडून चालक आणि त्याचा मित्र पसार झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास चिपळूण शहरातील आनंदखी हॉटेलसमोर बहादूरशेख नाका ते चिंचनाका जाणाऱ्या महामार्गावर अमोल वडार आणि त्यांचा मुलगा दुर्वांश हे दोघे रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी प्रमोद महादेव जाधव (वय ३१, रा. श्री अपार्टमेंट, चिपळूण) हा एमएच ०८ बीएल ११६० क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी हयगयीने व बेदरकारपणे भरधाव वेगात चालविल्याने त्याने रस्ता ओलांडणाऱ्या अमोल वडार आणि दुर्वांश यांना धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत पिता-पुत्राला लहान-मोठ्या तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघातानंतर प्रमोद जाधव आणि त्याच्यासोबत असलेला अभिजीत कुळे यांनी दुचाकी घटनास्थळीच सोडून तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अक्षय नारायण कलकटकी (वय ३५, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, रा. गांधीनगर, वडार कॉलनी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून प्रमोद महादेव जाधव याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास चिपळूण पोलिस करीत असून, अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेलेल्या व्यक्तींच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.


