(रत्नागिरी / वैभव पवार)
चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील दुर्गा माता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवातील दांडिया नृत्य स्पर्धेत अलोरे देऊळवाडी येथील अंजली राकेश सडकर हिने सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट दांडिया नृत्य पुरस्कार पटकावला. सन २०२४, २०२५ आणि २०२६ अशा सलग तीन वर्षांत हा सन्मान मिळवून तिने आपल्या नृत्यकौशल्याची छाप उमटवली आहे.
अंजली ही परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे. अभ्यासाबरोबरच तिला सांस्कृतिक कला आणि नृत्याची विशेष आवड आहे. बालवयापासूनच नृत्यकलेत प्रावीण्य मिळवलेल्या अंजलीने विविध नृत्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेत तसेच अन्य ठिकाणी आयोजित नृत्य स्पर्धांमध्येही तिने आपल्या कौशल्याची चमक दाखवली आहे.
अलोरे येथील नवरात्रोत्सवात दरवर्षी आयोजित होणाऱ्या दांडिया नृत्य स्पर्धेत अंजली नियमित सहभागी होते. आपल्या नृत्याविष्काराने परीक्षक आणि उपस्थितांची दाद मिळवत तिने सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट दांडिया नृत्य पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
अंजलीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अलोरे देऊळवाडीतील ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून तिचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.


