(गुहागर / वार्ताहर)
विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त, निरोगी आणि सुसंस्कारित जीवनाची दिशा मिळावी तसेच तंबाखू व इतर मादक पदार्थांच्या वाढत्या व्यसनापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने पीएमश्री स्कूल वेळणेश्वर क्र. १ येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनमुक्ती’ विषयावरील सुसंवाद कार्यक्रम आणि जनजागृती पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम आज मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शाळेच्या सभागृहात होणार आहे. यावेळी खेड सेंटर प्रमुख गीता बहेनजी, चिपळूण सेंटर प्रमुख दीपा बहेनजी, गुहागर सेंटर प्रमुख सीमा बहेनजी, संगीता बहेनजी तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे अन्य मान्यवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात व्यसनमुक्ती विषयावरील आकर्षक पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येणार असून, तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम चित्रे व माहितीच्या माध्यमातून उलगडून सांगितले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.
तंबाखूमुक्त शाळा अभियानाला बळकटी देणारा हा उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार असून, सर्व विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, सर्व सदस्य आणि शिक्षकवृंद यांनी केले आहे.
“चला, व्यसनमुक्त पिढी घडवूया; निरोगी, सुदृढ आणि संस्कारक्षम भारताच्या निर्मितीसाठी हातभार लावूया,” असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार असल्याची माहिती प्रशालेचे उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी दिली.

