(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभ परिसरासमोरील समुद्रात नियमबाह्य पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करत एकूण ८ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. एलईडी प्रकाशाच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकेस ५ लाख रुपयांचा दंड, तर बंदी असलेल्या सागरी हद्दीत ट्रॉलिंग करणाऱ्या दुसऱ्या नौकेस ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय अधिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांनी दिला.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या नवदुर्गा गस्ती नौकेद्वारे गेल्या शुक्रवारी रात्री अंजनवेल दीपस्तंभासमोरील समुद्रात नियमित गस्त घालण्यात येत होती. परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण, पर्यवेक्षक विनायक शिंदे, सुरक्षारक्षक अक्षय मयेकर आणि सहकारी या मोहिमेत सहभागी होते. गस्तीदरम्यान रत्नागिरी येथील अ. र. मयेकर यांच्या मालकीची ‘श्री सद्गुरु कृपा’ ही नौका एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी गुजरातमधील दीव येथील ‘ध्रुवशक्ती’ ही ट्रॉलिंग नौकाही बंदी असलेल्या समुद्री हद्दीत मासेमारी करताना आढळली.
राज्याच्या जलसीमेतील १२ नॉटिकल मैलांच्या आतील क्षेत्रात यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीस बंदी असताना या दोन्ही नौका सुमारे २० वाव अंतराच्या आत कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाले. विशेषतः एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करणे नियमबाह्य असल्याने संबंधित नौकेविरुद्ध गंभीर उल्लंघन नोंदविण्यात आले. दोन्ही नौका तातडीने ताब्यात घेऊन दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आल्या. त्यानंतर परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या न्यायालयात प्रतिवेदन सादर केले.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व बाजूंचा विचार करून अधिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी ‘श्री सद्गुरु कृपा’ नौकेचे मालक अ. र. मयेकर यांना ५ लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले, तर ‘ध्रुवशक्ती’ नौकेचे मालक विनोद सोळखी यांना ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला. समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संरक्षण आणि पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आला आहे.

